जळगावात इलेक्ट्रिक बसच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
जळगाव, 08 सप्टेंबर (हिं.स.) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या २९ वर्षीय तरुणीला भरधाव इलेक्ट्रिक बसने जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामदा फाट्यावर घडली. प्राची महेंद्र पवार (वय २९, रा. नव
जळगावात इलेक्ट्रिक बसच्या धडकेत तरुणीचा मृत्यू


जळगाव, 08 सप्टेंबर (हिं.स.) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या २९ वर्षीय तरुणीला भरधाव इलेक्ट्रिक बसने जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामदा फाट्यावर घडली. प्राची महेंद्र पवार (वय २९, रा. नवेगाव, मेहुणबारे) असं अपघातातील मयत तरुणीचे नाव असून या घटनेमुळे मेहुणबारे आणि नवेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राची पवार चाळीसगाव येथे राहणाऱ्या आपल्या काकूंना भेटण्यासाठी घरातून निघाली होती. त्यानंतर सव्वा आठच्या सुमारास ती जामदा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी धुळ्याकडून चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसने (क्र. एमएच ४९ बी झेड ८२७६) तिला जोरदार धडक दिली. धडकेनंतर प्राची गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला मोठी दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत तिला रुग्णवाहिकेतून मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे मेहुणबारे आणि नवेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली.

या प्रकरणी प्राचीचे वडील महेंद्र नारायण पवार (वय ६४), सेवानिवृत्त शिक्षक, यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून बसचालक नीलेश अशोक सोळंके (रा. वलठाण, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande