
अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हैदरपुरा भागात सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास एका वीस वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून व तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. शेख राहील उर्फ गणी (वय २०, रा. कबीर नगर) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सोमवारी रात्री घडलेल्या या थरारक घटनेत हल्लेखोरांनी तरुणाच्या शरीरावर तलवार व चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहीलला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु प्रकृती अतिगंभीर असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृतदेह पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. हत्येचे नेमके कारण आणि मारेकऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. विशेष म्हणजे, ५ सप्टेंबर रोजी गाडगे नगर हद्दीतील कपिल वस्तू नगर येथेही एका वीस वर्षीय तरुणाची हत्या झाली होती. त्या हत्येची शाई वाजत नाही तोच एका दिवसाच्या आत, ७ सप्टेंबर रोजी पुन्हा २० वर्षीय तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यंदाच्या वर्षातील (१ जानेवारी ते ७ सप्टेंबर ) ही ३५ वी हत्येची घटना ठरली आहे. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फाटा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला. गुन्हे शाखेचे अधिकारी अतुल व दिनेश दहातोंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलीस मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.
-----------------------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी