
मुंबई, 08 सप्टेंबर (हिं.स.)। ऑरिक सिटी शेंद्रा (जि.छत्रपती संभाजीनगर) येथील हयोसंग इंडिया प्रा.लि. यांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, 2023-28 अंतर्गत विशेष बाब म्हणून भांडवली अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
हयोसंग इंडिया प्रा.लि. यांनी सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत इलेस्टोमेरिक यार्न्स (स्पॅन्डेक्स) निर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. या उद्योगाने या विभागात उभा केलेला हा पहिला प्रकल्प असल्यामुळे 500 कोटीपेक्षा जास्त खर्चाच्या अनुषंगाने 5 टक्के आणि त्यापुढील 500 कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीवर पुन्हा 5 टक्के अनुदान देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार विदर्भ व मराठवाड्यात एक विशाल प्रकल्प म्हणून उद्योगाने केलेली गुंतवणूक व रोजगार निर्मिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीने त्यांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, 2023-28 अंतर्गत अनुदान देण्याची शिफारस केली आहे. या शिफारशीला अनुसरून विशेष बाब म्हणून अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर