
छत्रपती संभाजीनगर, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। गणेश मंडळांना परवानगीसाठी अडचण येऊ नये; वाहतूक, वीज आणि नागरी सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश सार्वजनिक गणेशोत्सव हा शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. यंदाचा गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा. उत्सवाच्या आनंदाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनासह महानगरपालिका, महावितरण आणि अन्य संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून योग्य नियोजन करावे. गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या मिळविण्यात तसेच नागरी सुविधांबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज दिले.
सार्वजनिक गणेशोत्सव-२०२६ च्या पूर्वतयारीसंदर्भात पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली एमआयटी विद्यापीठ परिसर, बीड बायपास मार्ग येथील मंथन हॉलमध्ये आज समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस पालकमंत्री संजय शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पना पिंपळे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, महावितरणचे अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. शिरसाठ म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष नियोजन करावे. मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे व्यवस्थापन, मिरवणुकीचे मार्ग आणि विसर्जनस्थळांवरील सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घ्यावी. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. महानगरपालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गणेश मंडळे आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात.
गणेश मंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांवर भर द्यावा. गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत नियमानुसार रात्री १२ वाजेपर्यंत ढोल पथकांचे कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येतील. मात्र, उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याकडे पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचेही काटेकोर पालन करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री श्री. शिरसाठ यांनी दिले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis