दिलीपराव देशमुख लातूरची ‘ऑक्सफोर्ड डिक्शनरी’; प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याची क्षमता — सहकारमंत्री
लातूर, 08 सप्टेंबर (हिं.स.)। दिलीपराव देशमुख हे लातूरची ‘ऑक्सफोर्ड डिक्शनरी’ असून, त्यांच्याकडे प्रत्येक समस्येचे निराकरण आहे. विविध संकल्पना प्रत्यक्षात आणत त्यांनी लातूर जिल्ह्यातील सहकार, बँकिंग, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांना मूर्त स्वरूप देण्य
दिलीपराव देशमुख


लातूर, 08 सप्टेंबर (हिं.स.)। दिलीपराव देशमुख हे लातूरची ‘ऑक्सफोर्ड डिक्शनरी’ असून, त्यांच्याकडे प्रत्येक समस्येचे निराकरण आहे. विविध संकल्पना प्रत्यक्षात आणत त्यांनी लातूर जिल्ह्यातील सहकार, बँकिंग, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांना मूर्त स्वरूप देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले.

शिरूर अनंतपाळ येथील श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीने माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख यांचा गौरव समारंभ तसेच ‘ग्रंथ रसिक’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मांजरा परिवारातील अनेक कारखान्यांना उच्चांकी दर मिळवून देण्यात दिलीपराव देशमुख यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती दिलीपराव देशमुख, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील सेलूकर, बंडाप्पा काळगे, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार आदींसह ग्रंथ रसिक लातूर जिल्हा, मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य, साहित्य व संस्कृती मंडळ तसेच श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाचे पदाधिकारी, साहित्यप्रेमी, महिला भगिनी व मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, दिलीपराव देशमुख आणि माझा स्नेह गेल्या ४० वर्षांपासून आहे. जिल्हा परिषद, बँकिंग आणि सहकार क्षेत्रात आम्ही एकत्र काम केले आहे. राज्यात सर्वाधिक सहवास लाभलेल्या व्यक्तींमध्ये दिलीपराव देशमुख यांचा समावेश होतो.

दिलीपराव देशमुख यांचा करण्यात आलेला हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा नसून, त्यांनी आतापर्यंत ज्या-ज्या घटकांना न्याय दिला, त्या सर्वांचा सन्मान आहे. दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांनी अनेक संस्थांना आकार दिला. एखादी संस्था सुरू करणे सोपे असते; मात्र ती संस्था यशस्वीपणे चालवणे अवघड असते. ही अवघड प्रक्रिया देखील दिलीपराव देशमुख यांनी सहजतेने पार पाडली असून, आजही ते अव्याहतपणे समाजसेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या ४० वर्षांच्या कार्याचा गौरव म्हणूनच त्यांना ‘सहकार भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याचेही बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक एल.बी. आवाळे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या भाषणातून मिळालेली पावती भावनिक — दिलीपराव देशमुख

सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलेल्या भावना म्हणजे माझ्या कार्याची पावती आहे. श्री अनंतपाळ येथे करण्यात आलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. आतापर्यंत अनेक घटकांना न्याय देता आला, याचे समाधान आहे. यापुढेही विविध घटकांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणार असल्याचे दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.

— दिलीपराव देशमुख

माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande