कंपनी सुरू करण्यासाठी ४१ लाखांची खंडणी; नऊ जणांना अटक
रायगड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी व्यवस्थापकाकडे तब्बल ४१ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास कंपनीवर ग्रामस्थांना आणून मारहाण करण्या
Extortion-of-41-lakh-to-start


रायगड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी व्यवस्थापकाकडे तब्बल ४१ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास कंपनीवर ग्रामस्थांना आणून मारहाण करण्याची धमकी देत कंपनीतील संगणकाची स्क्रीन, सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर मशीन जबरदस्तीने घेऊन गेल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी कंपनीत वायुगळतीची दुर्घटना होऊन दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कंपनी बंद होती. कंपनी पुन्हा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोपी वेळोवेळी कंपनीत जाऊन व्यवस्थापकाला जीवे मारण्याची धमकी देत होते.

आरोपी क्रमांक १ व ६ यांनी व्यवस्थापकाकडे प्रत्येकी मागणी केल्याचे, तर आरोपी क्रमांक ५ याने १० लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. “पैसे द्या, आम्ही ग्रामस्थांचे बघतो; पैसे दिले नाहीत तर गावातील लोकांना कंपनीवर आणून तुम्हाला ठोकून काढू, हातपाय तोडू,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.

दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपींनी कंपनीत गैरकायदेशीररीत्या प्रवेश करून व्यवस्थापकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कंपनीतील संगणकाची स्क्रीन फोडून सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर मशीन बळजबरीने घेऊन गेल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी महाड (एमआयडीसी) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८(५), ११९(१), ३२४(५), ३२९(३) व १९१(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील नऊ आरोपींना ७ सप्टेंबर रोजी रात्री १०.२६ वाजता अटक करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande