महिनाभरात पदे भरा, अन्यथा धरणे आंदोलन; संतोष देशमुख यांचा इशारा
परभणी, 08 सप्टेंबर, (हिं.स.) - पेडगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत मंजूर 17 पदांपैकी तब्बल सात पदे रिक्त असल्याने 455 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित गणि
महिनाभरात पदे भरा, अन्यथा धरणे आंदोलन : संतोष देशमुख यांचा इशारा


परभणी, 08 सप्टेंबर, (हिं.स.) - पेडगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत मंजूर 17 पदांपैकी तब्बल सात पदे रिक्त असल्याने 455 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित गणित शिक्षक उपलब्ध नसल्याने त्यांच्या शैक्षणिक नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी प्रशासनाला एक महिन्याची अंतिम मुदत दिली असून, या कालावधीत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या शाळेतील दोन प्राथमिक शिक्षक, एक प्राथमिक पदवीधर शिक्षक, एक माध्यमिक शिक्षक, एक राजपत्रित मुख्याध्यापक आणि दोन सेवकांची पदे रिक्त आहेत. शाळेने याबाबत 25 जून 2026 रोजी शिक्षण विभागाकडे लेखी मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही रिक्त पदे भरण्याबाबत कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गणित शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी येथील जिल्हा परिषद सदस्यांनी स्वखर्चातून खासगी शिक्षकाची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी लोकप्रतिनिधींनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असला, तरी शासकीय शाळेतील मंजूर पदांवर नियमित शिक्षक उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधींना स्वतःच्या खिशातून शिक्षकाची व्यवस्था करण्याची वेळ येणे ही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब असल्याची टीका होत आहे. लोकप्रतिनिधींचा स्वखर्च हा शासनाच्या जबाबदारीला पर्याय होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना नियमित शिक्षक उपलब्ध करून देणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी असून, त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी पालकांनी केली आहे. या संदर्भात प्रशासनाला एक महिन्याची अंतिम मुदत देण्यात आली असून, या कालावधीत ठोस कार्यवाही न झाल्यास विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या सहभागातून जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे लोकशाही व सनदशीर मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आता पत्रव्यवहार आणि आश्वासन नको; 455 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षक हवेत. मंजूर पदे तातडीने भरा; अन्यथा आंदोलनाची जबाबदारी प्रशासनाची असेल, अशी भूमिका संतोष देशमुख यांनी मांडली आहे.यासंदर्भातील निवेदन जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी अब्दुल नजीब यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, सदस्य गोविंद असोरे, अमोल पाथरकर आदी उपस्थित होते. निवेदनावर कर्ण कांबळे यांच्यासह सुमारे 400 पालकांच्या स्वाक्षर्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande