जेएनपीएला फ्रेट कॉरिडॉरची थेट जोडणी
रायगडच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी गती रायगड, ८ सप्टेंबर (हिं.स.)। देशाच्या मालवाहतूक व्यवस्थेला नवी गती देणाऱ्या पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांचे मंगळवारी राष्ट्राला समर्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य
Freight corridor gives a boost to industry and trade.


नमो


Freight-corridor-gives-a-boost


रायगडच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी गती

रायगड, ८ सप्टेंबर (हिं.स.)। देशाच्या मालवाहतूक व्यवस्थेला नवी गती देणाऱ्या पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांचे मंगळवारी राष्ट्राला समर्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. यावेळी चार मालगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून परिचालनाचा शुभारंभ करण्यात आला.

जेएनपीए येथे आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, व्यवस्थापकीय संचालक प्रवीणकुमार तसेच राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासह अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

सुमारे ३० हजार कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे देशातील प्रमुख बंदरे, औद्योगिक क्षेत्रे आणि बाजारपेठांदरम्यानची मालवाहतुकीची साखळी अधिक सक्षम होणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांसाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जेएनपीएला फ्रेट कॉरिडॉरची थेट जोडणी मिळाल्याने आयात-निर्यात मालाची वाहतूक अधिक जलद आणि किफायतशीर होण्यास मदत होणार आहे. देशातील प्रमुख बंदरांमधील कंटेनर हाताळणीत जेएनपीएचा वाटा सुमारे ५५ टक्के असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. एप्रिलमध्ये जेएनपीएमध्ये ३८.२७ लाख टीईयू कंटेनर हाताळण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी काळात कंटेनर हाताळणी क्षमतेत सुमारे १५ टक्के वाढ करण्याचे नियोजन असून, २०२९-३० पर्यंत बंदराची क्षमता आणखी वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.

फ्रेट कॉरिडॉरमुळे मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्याने मुंबईच्या विद्यमान रेल्वे नेटवर्कवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वेगाड्यांच्या परिचालनाला अधिक मोकळीक मिळून वेळेचे नियोजन सुधारण्यास मदत होईल. तसेच बंदरातून देशाच्या विविध भागांत कंटेनर जलद पोहोचविणे शक्य झाल्याने रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्वही कमी होण्याची शक्यता आहे.

जेएनपीएला फ्रेट कॉरिडॉरची थेट जोडणी मिळाल्याचा सर्वाधिक लाभ रायगडच्या औद्योगिक क्षेत्राला होण्याची अपेक्षा आहे. मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होणे, कंटेनर हाताळणीची क्षमता वाढणे तसेच देशभरातील बाजारपेठांशी जलद रेल्वे संपर्क निर्माण होणे यामुळे उद्योगांच्या विस्ताराला चालना मिळणार आहे.

यामुळे जेएनपीए परिसरात लॉजिस्टिक्स, वाहतूक, गोदामे आणि पूरक उद्योगांच्या विस्ताराला वेग मिळण्याची शक्यता आहे. नव्या गुंतवणुकीसह रोजगारनिर्मितीलाही चालना मिळून रायगडच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. फ्रेट कॉरिडॉरच्या माध्यमातून जेएनपीए देशाच्या व्यापारवाढीचे अधिक सक्षम प्रवेशद्वार म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे.-------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande