
अधिकाऱ्यांना अवमानाची नोटीस; ९ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
कोल्हापूर, ८ सप्टेंबर (हिं.स.) : गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या दूध संस्था अवसायनात गेल्याबाबतचा निर्णय पूर्णतः रद्दबातल ठरविण्यात आलेला असतानाही अंतिम मतदार यादीतून ४८ संस्थांना वगळल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून या संस्थांवर अन्याय केल्याचा ठपका ठेवत जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ आणि नारायण परजणे यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का करू नये, अशी नोटीस न्यायालयाने बजावली आहे.
न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने वगळण्यात आलेल्या सर्व ४८ दूध संस्थांचा पक्क्या मतदार यादीत तत्काळ समावेश करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना ९ ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेमके प्रकरण काय ?
गोकुळ दूध संघाच्या एकूण ५,४७० सभासदांची यादी सुरुवातीला सादर करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने ४ ऑगस्ट रोजी ५,३३२ सभासदांची अंतिम मतदार यादी जाहीर केली. या यादीतून एकूण १३८ संस्था वगळण्यात आल्या होत्या.वगळण्यात आलेल्या संस्थांमध्ये अवसायनातील ४८ दूध संस्थांचाही समावेश होता. या संस्था पूर्वी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत थेट पक्षकार नसल्याचे कारण पुढे करून त्यांना अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आले होते.
न्यायालयाची कडक भूमिका
या निर्णयाविरोधात संबंधित दूध संस्थांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, ३१ ऑगस्ट रोजी नारायण परजणे यांनी दिलेले आदेश यापूर्वीच पूर्णतः रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या संस्था मूळ याचिकेत पक्षकार नव्हत्या, त्यांनाही न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम मतदार यादीत समाविष्ट करणे आवश्यक होते.न्यायालयाच्या आदेशाचा विपर्यास करून संबंधित संस्थांना अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर देविदास मिसाळ आणि नारायण परजणे यांच्याविरुद्ध ‘सु-मोटो’ अवमान याचिका का दाखल करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
आता मतदारसंख्या ५,३८०
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या ४८ दूध संस्थांना दिलासा मिळाला आहे. या ४८ संस्थांचा यादीत समावेश केल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या अंतिम मतदार यादीतील सभासदांची संख्या ५,३३२ वरून ५,३८० इतकी झाली आहे.या प्रकरणात दूध संस्थांच्या वतीने ॲड. चेतन पाटील आणि ॲड. धैर्यशील पोवार यांनी बाजू मांडली, तर सरकारच्या वतीने ॲड. दिलीप बोडके यांनी युक्तिवाद केला.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar