
इस्लामाबाद , 08 सप्टेंबर (हिं.स.)।लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याचा मुलगा तल्हा सईद याने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. तसेच त्याने पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांचेही उघडपणे कौतुक केले आहे. असीम मुनीर यांनी ‘अल्लाहच्या मार्गातील ईमान, परहेजगारी आणि जिहाद’ या विचारांना ‘पुन्हा एकदा जिवंत केले’, असा दावा तल्हा सईदने केला आहे.
आपल्या भाषणात तल्हा सईदने मुनीर यांचे कौतुक करताना म्हटले की, ते कुराणाचे हाफिज आहेत. पाकिस्तानला अशा लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शलची साथ मिळाल्याचा आपल्याला आनंद असल्याचे त्याने सांगितले.ज्यांनी पवित्र कुराण मुखोद्गत केले आहे, अशा व्यक्ती देशाच्या लष्कराचे नेतृत्व करत असल्याचेही त्याने नमूद केले. मुनीर यांनी ‘ईमान, तक्वा आणि जिहाद’ म्हणजेच श्रद्धा, धर्मपरायणता आणि जिहाद या विचारांना पुन्हा जिवंत केले असल्याचा दावाही तल्हा सईदने केला.
संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दहशतवादी आणि लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज मुहम्मद सईद याचा मुलगा हाफिज तल्हा सईद याने पाकिस्तानातील शेखूपुरा येथे झालेल्या एका जाहीर सभेत ही वक्तव्ये केली. या सभेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. पाकिस्तानात बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या नेत्यांना मिळणाऱ्या कथित मोकळ्या वावाबाबत दीर्घकाळापासून आरोप होत असताना तल्हा सईदची ही वक्तव्ये महत्त्वाची मानली जात आहेत.
भारताविरोधात बोलताना लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईद याचा मुलगा तल्हा सईद म्हणाला की, त्याने आणि इतरांनी ‘जिहाद’ छेडण्याची शपथ घेतली आहे. जोपर्यंत ते जिवंत आहेत आणि हे करण्यास सक्षम आहेत, तोपर्यंत हे अभियान सुरूच ठेवणार असल्याचा दावा त्याने केला.“आम्ही तेच लोक आहोत, ज्यांनी जिहादाचा संकल्प केला आहे,” असे त्याने म्हटले. तसेच आणखी बलिदान देण्यासाठी आपण तयार असल्याचाही दावा त्याने केला.
भारताबाबत बोलताना लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईद याचा मुलगा तल्हा सईदने दावा केला की, मुस्लिमांनी उपखंडावर ५०० वर्षे राज्य केले होते. दिल्लीवरून राज्य करणारे लोक दिल्ली कोणाची होती, हे विसरले आहेत का, असा सवालही त्याने उपस्थित केला. “मुस्लिमांनी भारतावर ५०० वर्षे राज्य केले,” असे तो म्हणाला. आपला हा विचार ऐतिहासिक तथ्यांवर आधारित असल्याचा दावाही त्याने केला.तल्हा सईद सार्वजनिकपणे समोर येऊन भाषण करत असल्यामुळे लष्कर-ए-तैयबा ही प्रतिबंधित संघटना असतानाही पाकिस्तानस्थित दहशतवादी नेटवर्कशी संबंधित व्यक्तींना सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध होत असल्याच्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode