
छत्रपती संभाजीनगर, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। गतवर्षीप्रमाणे यंदाही डीजेच्या वापराबाबत प्रभावी कारवाई करण्यात येईल, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गणेशोत्सवासाठी पोलीस विभागाच्या तयारीची माहिती दिली. शहरातील बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीचे व विसर्जनाचे मार्ग आणि गर्दीचे व्यवस्थापन यांचे नियोजन करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त स्तरावर गणेश मंडळांच्या बैठका घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. वाळूज आणि पंढरपूर परिसरासाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेश मंडळांना परवानगी प्रक्रियेत अनावश्यक अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल.
शहरात अमली पदार्थांविरोधात गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळातही अवैध व समाजविघातक कृत्यांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष राहील. नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त श्री. पवार यांनी केले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis