हुथी बंडखोरांचा सौदी अरेबियातील विमानतळ, अरामकोच्या तेल प्रकल्पांवर हल्ला; ७३ जण जखमी
रियाद, 08 सप्टेंबर (हिं.स.)।येमेनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील अनेक नागरी आणि आर्थिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये किमान ७३ जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने याची पुष्टी केली असून, देशाच्या दक्षि
हुथी बंडखोरांचा सौदी अरेबियातील विमानतळ, अरामकोच्या तेल प्रकल्पांवर हल्ला; ७३ जण जखमी


रियाद, 08 सप्टेंबर (हिं.स.)।येमेनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील अनेक नागरी आणि आर्थिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये किमान ७३ जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने याची पुष्टी केली असून, देशाच्या दक्षिण भागातील अनेक ऊर्जा आणि तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले आहे.

येमेनमधील संघर्ष पुन्हा तीव्र झालेला असताना ही घटना घडली आहे. सौदीसमर्थित सरकार हुतींच्या ताब्यातील प्रदेश पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, हुतींनी सौदी अरेबियावर एका तुरुंगावर हवाई हल्ला केल्याचा आरोप केला असून, या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. येमेनच्या बहुतांश लोकसंख्येच्या भागासह उत्तरेकडील प्रदेशावर नियंत्रण असलेल्या हुती बंडखोरांनी या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सीमेजवळील आभा आंतरराष्ट्रीय विमानतळ, किंग खालिद एअर बेस तसेच सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी अरामकोच्या आभा आणि जिझान येथील ठिकाणांना लक्ष्य केले.

या मोठ्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. सौदी अधिकारी आणि माध्यमांच्या माहितीनुसार, या हल्ल्यांमुळे अनेक तेल प्रकल्पांमध्ये आग लागली आणि काही काळासाठी तेथील कामकाज थांबवावे लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्येही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनंतर तेल प्रकल्प आगीच्या ज्वाळांनी वेढलेले दिसत आहेत.

जुलैमध्ये येमेनमधील चार वर्षांपासून सुरू असलेला युद्धविराम संपल्यानंतर हुतींकडून करण्यात आलेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने कठोर शब्दांत इशारा देत म्हटले आहे की, देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सौदी अरेबिया सर्व आवश्यक पावले उचलेल.

सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडी २०१५ पासून हुतींविरोधात लढत आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा आघाडीने दिला आहे. आघाडीचे प्रवक्ते कर्नल तुर्की अल-मलिकी यांनी या हल्ल्याला ‘दहशतवादी हुती मिलिशियाचे धोकादायक पाऊल’ असे संबोधले. या हल्ल्यात ७३ नागरिक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, या धोक्याचा स्रोत नष्ट करण्यासाठी आणि आपल्या संरक्षणासाठी आम्ही सर्व आवश्यक लष्करी कारवाई करू.

सौदी प्रेस एजन्सीनुसार, ऊर्जा मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले की, या हल्ल्यांमुळे अनेक ठिकाणी आग लागली आणि काही जण जखमी झाले. त्यामुळे काही कामे तात्पुरती थांबवावी लागली.जुलैपासून हुती बंडखोर सौदी अरेबियाला सातत्याने लक्ष्य करत आहेत. त्यांनी रियाधविरोधात नौदल नाकेबंदीची घोषणा केली होती आणि लाल समुद्रातील जहाजांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती.

कर्नल तुर्की अल-मलिकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर निवेदन जारी करत म्हटले की, जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदार देशाच्या नागरी आणि आर्थिक ठिकाणांना लक्ष्य करून हुतींनी परिस्थिती अत्यंत धोकादायक बनवली आहे. या दहशतवादी गटाला रोखण्यासाठी आघाडी सर्व आवश्यक पावले उचलेल, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande