
कृषिमंत्री, जलसंपदा मंत्री व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिवांकडे मागणी
परभणी, ८ सप्टेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून अनेक ठिकाणी पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून पात्र शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा शंभर टक्के लाभ द्यावा. तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केली
याबाबत आ. डॉ. राहुल पाटील यांनी मंत्रालयात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
परभणी जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आणि अनियमित राहिले आहे. विशेषतः जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात केवळ सुमारे ६५ मि.मी. पाऊस झाल्याने जमिनीत अपेक्षित ओलावा निर्माण झाला नाही. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, अनेक भागांत उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके करपली आहेत.
या गंभीर परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, पात्र शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा शंभर टक्के लाभ मिळवून द्यावा, तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि आवश्यक दुष्काळी सवलती द्याव्यात, अशी मागणी आ. पाटील यांनी निवेदनातून केली.
लोअर दुधना, जायकवाडीतून पुरेसे पाणी सोडण्याची मागणी
पिके वाचविण्यासाठी लोअर दुधना आणि जायकवाडी प्रकल्पातून शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्याची मागणीही आ. पाटील यांनी केली आहे.
लोअर दुधना प्रकल्पाच्या कालव्याची पाणीवहन क्षमता आणि उपलब्ध पाण्याचे नियोजन लक्षात घेता ५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडल्यास अंदाजे तीन हजार हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. तसेच ५५ एमसीएम पाण्याचा एक पूर्ण राऊंड होतो. त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या गरजेनुसार लोअर दुधना प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे सध्या २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांची गरज आणि कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी हा विसर्ग वाढवून १२०० क्युसेक्सने पाणी सोडावे, अशी मागणी आ. पाटील यांनी केली.
१२०० क्युसेक्सने पाणी सोडल्यासच कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहोचून सर्व शेतकऱ्यांना जायकवाडीच्या पाण्याचा पुरेसा लाभ मिळू शकतो, असे आ. डॉ. राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis