
तेहरान, 08 सप्टेंबर (हिं.स.)। इराणने आज, मंगळवार सकाळपासून निर्धारित मासिक कोट्यापेक्षा जास्त पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी पेट्रोलचे दर दुप्पट केले आहेत. सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच, पेट्रोलच्या वाढीव दरातून मिळणारी अतिरिक्त रक्कम कुटुंबांना दिली जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
मात्र, इराण आधीच सुमारे ६७ टक्के वार्षिक महागाई, कमकुवत चलन आणि घटती क्रयशक्ती अशा आर्थिक संकटांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल महागल्याचा परिणाम वाहतूक तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे भविष्यात महागाई आणखी वाढण्याची भीती सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
डिसेंबरनंतर पेट्रोलच्या किमतीत झालेली ही दुसरी वाढ आहे. इराणमध्ये पेट्रोलच्या दरवाढीचा मुद्दा अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या निर्णयामुळे महागाईचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. २०१९ मध्येही पेट्रोलच्या किमतीत अशाच प्रकारे वाढ करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले होते. सरकारच्या कारवाईत कथितपणे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेसोबतच्या तणावाचा थेट उल्लेख न करता सरकारने आपल्या घोषणेत केवळ ‘सध्याची परिस्थिती’ असा उल्लेख केला आहे. पेट्रोलच्या दरवाढीतून मिळणारी अतिरिक्त रक्कम कुटुंबांना देण्यात येईल, असे सरकारने सांगितले आहे.
नवीन व्यवस्थेनुसार, एका महिन्यात ११० लिटर (२९ गॅलन) या निर्धारित कोट्यापेक्षा जास्त पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना आता प्रति लिटर १,००,००० रियाल (सुमारे ७ सेंट) मोजावे लागतील. डिसेंबरपासून लागू असलेल्या दराच्या तुलनेत ही किंमत दुप्पट आहे. इराणमधील पेट्रोलचे दर अद्यापही जगातील सर्वात कमी दरांपैकी आहेत. मात्र, दरवाढीमुळे ९ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील मोठ्या वर्गावर दैनंदिन खर्चाचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. इराणचे चलन आधीच विक्रमी नीचांकी पातळीवर घसरत असून, नागरिकांची क्रयशक्ती सातत्याने कमी होत आहे.सोमवारी अमेरिकी डॉलरचा दर २२.२ लाख रियालपर्यंत पोहोचला होता. सरकारी तेल वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केरामत वेइस करामी यांनी सोमवारी सांगितले की, पेट्रोलच्या नव्या दराचा परिणाम सुमारे १५ टक्के ग्राहकांवर होईल. सरकारी वृत्तसंस्थाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये इराणमधील पेट्रोलचा वापर विक्रमी पातळीवर पोहोचला. पेट्रोलचा दैनंदिन वापर वाढून १४५ दशलक्ष लिटर (३८ दशलक्ष गॅलन) झाला होता. याच्या तुलनेत देशाची देशांतर्गत उत्पादन क्षमता दररोज १२२ दशलक्ष लिटर आहे.मागणी आणि देशांतर्गत उत्पादन यातील उर्वरित तफावत आयातीच्या माध्यमातून भरून काढली जाते.पेट्रोलच्या किमती वाढवल्यामुळे इंधनाचा अतिरिक्त वापर कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, इराणमध्ये पेट्रोलचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर होण्यामागे जुन्या वाहनांची संख्या हे एक प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.याशिवाय वाहनांच्या सुट्या भागांची उपलब्धता आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळेही इंधनाचा वापर वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode