जळगाव-नशिराबादमधील सहा सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार
जळगाव , 08 सप्टेंबर (हिं.स.) नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाने मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. महाराष्ट्र पो
जळगाव-नशिराबादमधील सहा सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार


जळगाव , 08 सप्टेंबर (हिं.स.) नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाने मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव विभाग यांच्या आदेशानुसार सहा जणांना तब्बल एक वर्षाच्या कालावधीसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये अताउल्ला उर्फ मायाबाई अमानुल्ला शहा, मुकतार शहा खलील शहा, अक्रम शहा सादिक शहा, रोहित दिलीप नाथ, विपुल गोविंदा नाथ आणि आवेश उर्फ काल्या शेख जहांगीर (सर्व रा. नशिराबाद, ता. जि. जळगाव) यांचा समावेश आहे.सदर इसमांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यांच्या सातत्याने सुरू असलेल्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा, यासाठी नशिराबाद पोलीस ठाण्यातर्फे संबंधितांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी सहाही जणांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

या कारवाईमुळे नशिराबाद परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण आणण्यास मदत होणार आहे. दरम्यान, हद्दपारीच्या कालावधीत संबंधितांनी परवानगीशिवाय जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यास महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका गुणवंत देशमुख, पोहेका चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर आणि पोलीस कॉन्स्टेबल पंकज सोनवणे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande