स्वामी समर्थ मठातील पादुका चोरीचा छडा; पुण्यातून दोघे जेरबंद
रायगड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। खालापूर गावातील श्री स्वामी समर्थ मठातील मंदिरातून चोरीस गेलेल्या चांदीच्या पादुकांचा अवघ्या चार दिवसांत छडा लावत खालापूर पोलिसांनी राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील दोघांना पुण्यातून जेरबंद केले. महेंद्रसिंग शैतानसिंग राठो
karjat


चोरी


रायगड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। खालापूर गावातील श्री स्वामी समर्थ मठातील मंदिरातून चोरीस गेलेल्या चांदीच्या पादुकांचा अवघ्या चार दिवसांत छडा लावत खालापूर पोलिसांनी राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील दोघांना पुण्यातून जेरबंद केले. महेंद्रसिंग शैतानसिंग राठोड (४५) आणि रवी जटाशंकर सोनी (३२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सुमारे ६५६ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका हस्तगत करण्यात आल्या आहेत.

गेल्या २ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३२ ते ७.३६ वाजण्याच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी खालापूर गावातील श्री स्वामी समर्थ मठात प्रवेश करून स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोरील दानपेटीच्या पुढे ठेवलेल्या चांदीचे आवरण असलेल्या लाकडी पादुका चोरून नेल्या. याप्रकरणी मठाचे अध्यक्ष दीपक रघुनाथ बोंदार्डे यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेनंतर पोलिसांनी मठातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एका चोरट्याने पांढरा शर्ट-पँट परिधान करून चेहऱ्यावर मास्क लावून मठात प्रवेश केल्याचे आणि पादुका चोरून नेल्याचे दिसून आले. चोरीनंतर दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून खोपोली-पनवेल मार्गे पुढे गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र, सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने मोटारसायकलचा क्रमांक मिळत नव्हता.

पोलिसांनी खालापूर दांडफाटा, खारपाडा, पेण, कोलाड, ताम्हिणी घाट आणि पुणे मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. अखेर ६ सप्टेंबर रोजी रात्री ९.२५ वाजता पुणे परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके, हवालदार देवेंद्र शिनगारे, संतोष जाधव, शेखर मोरे, पोलीस कर्मचारी रुपेश खोत, निलेश कुंबारे, अर्जुन मोरे आणि अमोल राठोड यांच्या पथकाने केली. आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. श्रद्धास्थानातील चोरीचा अल्पावधीत छडा लावत चांदीच्या पादुका हस्तगत केल्याबद्दल खालापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande