प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरणास मान्यता
मुंबई, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता व एकसंधता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी
प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरणास मान्यता


मुंबई, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता व एकसंधता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या सुधारित धोरणानुसार आरक्षणासाठी पात्र खेळाडूंना तीन महिन्यांच्या मुदतीत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

क्रीडा क्षेत्रात जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबतचे सुधारित धोरण लागू करण्यात येत आहे. हे आरक्षण मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती व महानगरपालिका, शासकीय उपक्रम, मंडळे, महामंडळे व विद्यापीठे, शासकीय अनुदानित शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा व सहकारी संस्था (बँका, साखर कारखाने इ.), याशिवाय सहायक अनुदान मिळणाऱ्या शासनमान्य स्वेच्छा संस्था यांच्यासह अन्य ज्या-ज्या प्रकारच्या संस्था व कार्यालयांना राज्य शासनाकडून निधी अथवा अनुदान मिळते अशा सर्व प्रकारच्या संस्था, मंडळांच्या आस्थापनेवर गट-अ, ब, क आणि ड मधील सरळसेवेच्या पदांसाठी खेळाडूंना पाच टक्के समांतर आरक्षण लागू राहणार आहे.

ऑलिम्पिक (समर) स्पर्धांमधील 2005 नंतर सलग तीन ऑलिम्पिक गेम्समध्ये समाविष्ट असलेले खेळ आणि स्थानिक खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो-खो, बुद्धीबळ, मल्लखांब व क्रिकेट हे देशी खेळ आरक्षणासाठी पात्र असतील. त्याचबरोबर पात्र खेळांची अट ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक गेम्स, एशियन गेम्स, पॅरालिम्पिक एशियन गेम्स व कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धांना लागू राहणार नाही. ज्या-ज्या वर्षी ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक गेम्स, एशियन गेम्स, पॅरालिम्पिक एशियन गेम्स व कॉमनवेल्थ गेम्स होतील त्या-त्या वर्षात या स्पर्धांमध्ये आयोजित होणारे खेळ आरक्षणासाठी पात्र राहतील.

मान्यताप्राप्त संघटनांमार्फत आयोजित होणा-या स्पर्धांसाठी वरिष्ठ, युवा व कनिष्ठ वयोगटातील खेळाडू आरक्षणासाठी पात्र असतील. शालेय (19 वर्षाखालील वयोगट) व खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमधील युथ, युनिव्हर्सिटी आणि पॅरा गेम्समधील खेळ, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमधील खेळ पात्र ठरतील.

या सुधारित धोरणात क्रीडा ई-प्रमाण स्वयंचलित डिजिटल कार्यप्रणालीमुळे लागू करण्यात येत आहे. यामुळे बोगस प्रमाणपत्रांना चाप बसणार आहे. या प्रणालीत स्पर्धा संपल्यानंतर 7 दिवसांच्या आत निकाल डिजिटल स्वाक्षरीने अपलोड करणे बंधनकारक होणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे डेटा कायमस्वरुपी जतन करण्यात येत असून त्यात कोणताही फेरफार करणे शक्य नसून ऑटोमेटेड क्रिप्टोग्राफिक हॅशद्वारे तत्काळ सत्यता पडताळणी होणार आहे.

नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत धोरणात सुसूत्रता व एकसंधता आणण्यासाठी यापूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करण्यात आले असून एकत्रित सुधारित धोरणासंबंधीचा शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. यापूर्वीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आरक्षणाकरिता पात्र होत असलेल्या खेळाडू उमेदवारांना देखील सुधारित शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्या क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणे आवश्यक राहील.

गट अ पदासाठी अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक गेम्स, एशियन्स गेम्स, वरिष्ठ गटाच्या जागतिक चॅम्पियनशीप/कप, वरिष्ठ गटाच्या एशियन चॅम्पियनशीप/कप, कॉमनवेल्थ गेम्स, वरिष्ठ गटाच्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप/कप, ग्रँडमास्टर (बुध्दीबळ), टेनिस ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा तसेच पॅरालिम्पिक गेम्स, पॅरा एशियन गेम्स या क्रीडा स्पर्धांचा समावेश असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवणारे खेळाडू पात्र असतील.

गट-ब (राजपत्रित) पदासाठी युवा/कनिष्ठ गटातील जागतिक चॅम्पियनशीप, एशियन चॅम्पियनशीप/कप, कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप/कप, युथ ऑलिम्पिक /एशियन/कॉमनवेल्थ गेम्स, आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारे आयोजित जागतिक तसेच आशियाई शालेय क्रीडा स्पर्धा (फक्त 19 वर्षाखालील गट मुले/मुली), जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा (बुध्दीबळ), पॅरा जागतिक / एशियन /कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप या स्पर्धांतील पदकप्राप्त खेळाडू पात्र असतील.

गट-ब पदासाठी (अराजपत्रित) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (National games), राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा/राष्ट्रीय फेडरेशन कप स्पर्धा (अधिकृत एकविध खेळ संघटनेमार्फत आयोजित वरिष्ठ / युथ / कनिष्ठ क्रीडा स्पर्धा), पॅरा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (पॅरा ऑलिम्पिक कमिटी द्वारा आयोजित), राष्ट्रीय शालेय खेळ महासंघाव्दारा आयोजित, राष्ट्रीय शालेय (१९ वर्षाखालील वयोगटाची) क्रीडा स्पर्धांतील पदकप्राप्त खेळाडू पात्र असतील.

गट-क पदासाठी खेलो इंडिया स्पर्धा (SAI द्वारे आयोजित), अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, राज्य स्तर वरिष्ठ / युथ / कनिष्ठ क्रीडा स्पर्धा (अधिकृत एकविध खेळ संघटनेमार्फत आयोजित), राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा (फक्त १९ वर्षाखालील गट मुले/मुली), राज्यस्तर आंतर विद्यापीठ स्पर्धा (अश्वमेध)/(क्रीडा महोत्सव) / पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धा आणि राज्यस्तर पॅरा ऑलिम्पिक व मान्यता प्राप्त संघटनेने आयोजित केलेल्या राज्यस्तर पॅरा क्रीडा स्पर्धांतील पदकप्राप्त खेळाडू पात्र असतील.

गट-ड पदासाठी खेळ विषयक अर्हता धारण करणारा खेळाडू अथवा वरिष्ठ गटातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा/वरिष्ठ गटातील राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा, वरिष्ठ गटातील पॅरा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडू पात्र असेल.

आरक्षणात या खेळांचा समावेश -

धनुर्विद्या (Archery), ॲथलेटिक्स / मैदानी व धावण्याचे खेळ (Athletics), बॅडमिंटन (Badminton), बास्केटबॉल (Basketball), मुष्टियुद्ध (Boxing), कॅनोइंग व कयाकिंग (Canoeing & Kayaking), क्रिकेट (Cricket) , सायकलिंग (Cycling), तलवारबाजी (Fencing),

फुटबॉल (Football), जिम्नॅस्टिक्स / कसरतपटूंचे खेळ (Gymnastics), हँडबॉल (Handball), हॉकी (Hockey), ज्यूडो (Judo), कबड्डी (Kabaddi), खो-खो, मल्लखांब, नौकानयन (Rowing), रग्बी (Rugby), नेमबाजी (Shooting), जलतरण (Swimming), टेबल टेनिस (Table Tennis)

तायक्वांदो (Taekwondo), ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, आधुनिक पंचक्रीडा (Modern Pentathlon), वेटलिफ्टिंग / भारोत्तोलन (Weightlifting), कुस्ती, स्केटबोर्डिंग (Skateboarding), सर्फिंग (Surfing), क्रीडा गिर्यारोहण (Sports Climbing), गोल्फ (Golf), बुद्धिबळ (Chess) , अश्वारोहण (Equestrian), नौकानयन / सेलिंग (Sailing), टेनिस (Tennis)

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande