डीआरआयने देशभरात ७४० किलो अंमली पदार्थ केले जप्त; १३ जणांना अटक
नवी दिल्ली, 09 सप्टेंबर (हिं.स.)। महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू केलेल्या अभियानाअंतर्गत गेल्या १५ दिवसांत देशभरात आठ मोठ्या कारवाया केल्या. या कारवायांमध्ये सुमारे ७४० किलो गांजा, हाय-ग्रेड हायड्रोपोनिक क
DRI NARCOTICS SEIZURE


नवी दिल्ली, 09 सप्टेंबर (हिं.स.)। महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू केलेल्या अभियानाअंतर्गत गेल्या १५ दिवसांत देशभरात आठ मोठ्या कारवाया केल्या. या कारवायांमध्ये सुमारे ७४० किलो गांजा, हाय-ग्रेड हायड्रोपोनिक कॅनॅबिस आणि चरस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या मादक पदार्थांमध्ये ७०९.६ किलो गांजा, २४.५ किलो हाय-ग्रेड हायड्रोपोनिक कॅनॅबिस आणि पाच किलो चरसचा समावेश आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ८ सप्टेंबर रोजी रायपूरजवळील ओल्ड धमतरी रोडवर विशाखापट्टणम येथून येणारे दोन ट्रक अडवून त्यांची झडती घेतली. यावेळी ट्रकच्या लोडिंग एरियामध्ये ठेवलेल्या १० पोत्यांमध्ये लपवून ठेवलेली ६१ पाकिटे आढळून आली. त्यामध्ये ३७५.९५ किलो गांजा आढळला. दोन्ही ट्रक जप्त करून चार जणांना अटक करण्यात आली. यापूर्वी २६ ऑगस्ट रोजी रायपूरजवळ एका ट्रकमधून सुमारे १२४ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

गेल्या ५ आणि ६ सप्टेंबर रोजी केलेल्या आणखी एका कारवाईत डीआरआयने पाटणाजवळील औरंगाबाद-पटना महामार्गावर एका ट्रकचा पाठलाग करून तो अडवला. कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांवर हल्लाही करण्यात आला. यामध्ये एक अधिकारी जखमी झाला, तर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. वाहनाची झडती घेतली असता चालकाच्या केबिनच्या मागे तयार करण्यात आलेल्या गुप्त कप्प्यातून १४०.५ किलो गांजा जप्त करण्यात आला. आणखी एका कारवाईत १ आणि २ सप्टेंबर रोजी पंजाबमधील लुधियानाजवळ एका कारमधून सुमारे ६९ किलो गांजा जप्त करण्यात आला. हा मादक पदार्थ वाहनाच्या तळामध्ये तयार करण्यात आलेल्या विशेष गुप्त कप्प्यांमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली.

गोरखपूर रेल्वे स्थानकावर ३ सप्टेंबर रोजी अमरनाथ एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्या तीन जणांची झडती घेतली असता सुमारे पाच किलो चरस जप्त करण्यात आला. तपासादरम्यान हा चरस नेपाळमधून तस्करी करून आणल्याचे संकेत मिळाले. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. गेल्या १५ दिवसांदरम्यान हैदराबाद आणि बेंगळुरू विमानतळांवर व्हिएतनाममधील हनोई तसेच थायलंडमधील बँकॉक येथून आलेल्या प्रवाशांकडून करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे २४.६ किलो हाय-पोटेंसी कॅनॅबिस जप्त करण्यात आले. या प्रकरणांमध्ये तीन जणांना अटक करण्यात आली. डीआरआयने सांगितले की, रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने केली जाणारी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी एजन्सी सातत्याने लक्ष ठेवून आहे. अशा तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी गुप्त माहितीच्या आधारे यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande