
यवतमाळ, 09 सप्टेंबर (हिं.स.)। तब्बल १२ वर्षांपासून बसची वाट पाहणाऱ्या मालखेड बुद्रूककरांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला. गावात बस येताच ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. चालक विनोद पवार व वाहक सागर मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.
नेर-यवतमाळ मार्गावरील येलगुंडा गावातून मालखेड बुद्रुककडे जाणाऱ्या मार्गावर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची मोठी कमतरता होती. गावात एसटी बस नसल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीसाठी जाणाऱ्या नागरिकांना अक्षरशः पायपीट करावी लागत होती. विशेषतः विद्यार्थ्यांना मालखेड बुद्रुक येथून येलगुंडापर्यंत पायी प्रवास करून पुढील प्रवासाची सोय करावी लागत होती. गावाची ही समस्या शिवसेनेचे पदाधिकारी सचिन पाटील माहुरे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांसह आगार व्यवस्थापक पंकज दांडगे, रोशन चोपडे आणि पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेश ढोकणे यांनी पाठपुरावा केला. बस गावात दाखल होताच ग्रामस्थांनी एसटीचे स्वागत करत चालक व वाहकाचा सत्कार केला. ‘आता आमची पायपीट थांबली’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी सचिन माहुरे, बाबन भोयर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी