परभणी - कर्मचा-यांनी आयुक्तांच्या वाहनाला घातला घेराव; घंटागाडीतील कचरा फेकला रस्त्यावर
परभणी, 09 सप्टेंबर, (हिं.स.)। थकीत वेतन तातडीने अदा करावे, परभणी महानगरपालिकेसाठी वाढीव जीएसटी अनुदान मंजूर करावे तसेच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम देण्यात यावी, या विविध मागण्यांसाठी मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे मनप
परभणी - कर्मचा-यांनी आयुक्तांच्या वाहनाला घातला घेराव; घंटागाडीतील कचरा फेकला रस्त्यावर


परभणी, 09 सप्टेंबर, (हिं.स.)। थकीत वेतन तातडीने अदा करावे, परभणी महानगरपालिकेसाठी वाढीव जीएसटी अनुदान मंजूर करावे तसेच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम देण्यात यावी, या विविध मागण्यांसाठी मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे मनपाच्या संतप्त आंदोलक कर्मचार्यांनी बुधवारी (दि. 9) वाढली. मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या वाहनाला घेराव घालत महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या मागण्यांबाबत जाब विचारला. तसेच शहरातून जाणारी घंटागाडी अडवून त्यातील कचरा जागेवरच रस्त्यावर रिकामा करण्यात आला. या प्रकारामुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नासिर खान यांच्या नेतृत्वाखाली मागील महिनाभरापासून कर्मचारी कामबंद व धरणे आंदोलन करीत आहेत. मात्र, आंदोलनाला महिना उलटूनही शासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याचा आरोप कर्मचार्यांनी केला आहे. थकीत वेतनामुळे कर्मचार्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कर्मचार्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत परभणी महानगरपालिकेसाठी वाढीव जीएसटी अनुदानाबाबत कोणताही ठोस निर्णय अथवा ठराव न झाल्याने कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी कर्मचार्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले. आयुक्तांचे वाहन अडवून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शहरातून जाणारी घंटागाडी थांबवून त्यातील कचरा रस्त्यावर टाकण्यात आला. थकीत वेतन तातडीने अदा करा, वाढीव जीएसटी अनुदान मंजूर करा, सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम द्या, अशा मागण्यांसाठी कर्मचार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

महापालिका कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. महिनाभरापासून कामबंद व धरणे आंदोलन करूनही शासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने कर्मचारी आक्रमक भूमिका घेत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष नासिर खान, के. के. भारसाकळे, अनुसयाबाई जोगदंड, राज्य उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव विशाल उपाडे, उपाध्यक्ष विनय ठाकूर, करण गायकवाड, मनोज तळेकर, बाशिद खान, ज्योती मोरे, आशा गायकवाड, भागवत कन्नूर, संगीता उबाळे, प्रकाश गायकवाड, सीमा लहाने, सीताबाई तांबे, शोभाबाई दालगुडे, फुलाबाई तृतीया देशमुख, पौर्णिमा पुंडगे, सावित्री टारफे यांच्यासह महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande