
नंदुरबार, 09 सप्टेंबर, (हिं.स.) नंदुरबार जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासह जिल्ह्यातील गुंतवणुकीच्या संधी वाढविणे, नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गुरुवार, 10 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) निलेश गायकवाड यांनी दिली आहे. या परिषदेस नंदुरबार जिल्ह्यातील गुंतवणूकदार, उद्योजक तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
परिषदेत जिल्ह्यातील विविध गुंतवणूकदारासोबत सुमारे 150 ते 200 सामंजस्य करार (MoUs) करण्यात येणार आहेत. तसेच, गुरुवार, दि. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता उद्योजकांसाठी बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, गुंतवणूकदार, उद्योजक, निर्यातदार तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या सोबत उद्योग क्षेत्राच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद 2026 च्या माध्यमातून जिल्ह्यातील गुंतवणूकदार व व्यावसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करणे, उद्योगांच्या विस्ताराला गती देणे तसेच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यातील उद्योजक, गुंतवणूकदार, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच उद्योजकांनी या जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) तथा जिल्हा उद्योग केंद्र, निलेश गायकवाड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर