
छत्रपती संभाजीनगर, 09 सप्टेंबर (हिं.स.) संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा तसेच संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस)-I परीक्षा-२०२६ रविवार, दि. १३ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण १३ परीक्षा उपकेंद्रांवर ४ हजार ११२ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दोन सत्रात होणार परीक्षा
राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा एकूण ११ शाळा व महाविद्यालयांमध्ये दोन सत्रांत होणार आहे. पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत, तर दुसरे सत्र दुपारी २ ते साडेचार वाजेपर्यंत होईल.
सीडीएस-I परीक्षा-२०२६ दोन शाळा व महाविद्यालयांमध्ये तीन सत्रांत घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते ११, दुसरे सत्र दुपारी साडेबारा ते अडीच वा आणि तिसरे सत्र दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत होईल.
परिक्षार्थींसाठी सुचना
परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी आयोगाने कडक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा कक्षात प्रवेशासाठी उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्रासह स्वतःच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे वाहनचालक परवाना यापैकी किमान एक मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
परीक्षा कक्षात पेपर सुरू होण्याच्या दीड तास अगोदर उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल. प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या अथवा निळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन, ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत, मास्क आणि पारदर्शक सॅनिटायझरची बाटली याव्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास परवानगी राहणार नाही.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांना सक्त मनाई
डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल फोन, ब्लूटूथ उपकरण, कॅमेराफोन अथवा अन्य कोणतेही संदेशवहन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणल्यास ते उमेदवारांना स्वतःच्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवावे लागेल. या साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी आयोगाची राहणार नाही.
प्रतिबंधित साहित्य परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत आणल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवाराविरुद्ध फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. तसेच आयोगाच्या आगामी परीक्षांसाठी संबंधित उमेदवारावर बंदी घालण्यात येऊ शकते.
आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांसाठी प्रवासाचा पास म्हणून ग्राह्य धरले जाईल. परीक्षेसाठी स्वतंत्र ई-पास अथवा अन्य परवानगीची आवश्यकता राहणार नाही. मात्र प्रवेश प्रमाणपत्रासोबत विहित मूळ ओळखपत्र बाळगणे आणि तपासणीच्या वेळी ते सादर करणे अनिवार्य राहील.
परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या सर्व उमेदवारांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, असे सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis