
परभणी, 09 सप्टेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यात मागील 45 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. पावसाअभावी शेतातील पिके करपण्यास सुरुवात झाली असून अनेक गावांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने तातडीने आधार देत सरसकट आर्थिक मदत करावी, अशी आग्रही मागणी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पालकमंत्री बोर्डीकर यांनी बुधवारी (दि.09) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून परभणी जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी आणि कष्टकरी वर्गावर आणीबाणीची परिस्थिती ओढवली आहे. खरीप हंगामातील पिकांना पावसाची नितांत गरज असताना पाऊस नसल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी हा अन्नदाता असून सध्याच्या संकटाच्या काळात त्याला शासनाच्या मदतीची ताकद देणे गरजेचे आहे. पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकमंत्री बोर्डीकर यांनी निवेदनातून केली. शेतकर्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, यावेळी आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. पालकमंत्री बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यातील शेतकरी-कष्टकर्यांवर ओढवलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना देत तातडीने मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis