
सिन्नर, 09 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांचा पारंपरिक सण म्हणून ओळखला जाणारा 'श्रावण पाणी' सण सिन्नर शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. तृतीयपंथीयांनी वाजतगाजत देवीची मिरवणूक काढली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर हिंदू धर्म रक्षक शुभांगी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री यल्लमा (रेणुका) माता जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू धर्म रक्षक गुरुवर्यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडला. उत्सवाची सुरुवात सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान देवीच्या पंचामृत अभिषेकाने करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ ते ६ वाजेदरम्यान देवीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. शेकडो तृतीयपंथीयांनी यात्रेत सहभाग घेतला. ही मिरवणूक कुंदेवाडी येथून सुरू होऊन वावीवेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेशपेठ, नवापूल, नाशिक वेस, लाल चौक, व्यापारी बँक चौक व पोस्ट ऑफिस परिसरातून काढण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI