
सोलापूर, 09 सप्टेंबर (हिं.स.)। माढा मतदारसंघातील शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आमदार अभिजीत आबा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी त्यांनी पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले आणि सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
माढा आणि पंढरपूर तालुक्यांतील सिंगल फेज लोडशेडिंग तातडीने कमी करून शेतकऱ्यांना किमान आठ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी केली. कमी पावसामुळे माढा, माळशिरस, पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दुष्काळग्रस्त आणि गरजू गावांमध्ये चारा छावण्या सुरू करून जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार हमी योजनेची कामेही तातडीने सुरू करावीत, असे आमदार पाटील यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी शाळांची फी कमी करण्याबाबतही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना सौरऊर्जा कनेक्शनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार पाटील यांनी केली.
‘सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासन नको, तर तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही झाली पाहिजे,’ अशी स्पष्ट भूमिका आमदार अभिजीत आबा पाटील यांनी मांडली. मतदारसंघातील या प्रश्नांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड