
पुणे, 09 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या विकासकामांमधील प्रशासकीय दिरंगाई दूर करून गावागावांतील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रभाग समित्यांची पुन्हा स्थापना करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या यशस्वी पॅटर्नचा आधार घेत पुणे जिल्हा परिषदेतही या समित्या कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी केली. सन २०१७ ते २०२२ या कालावधीत प्रभाग समित्यांनी प्रभावीपणे काम केले होते.
प्रशासकीय अडथळे, निधी वितरणातील अडचणी आणि विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव यांसारख्या प्रश्नांवर समित्यांच्या बैठकीत थेट चर्चा करून निर्णय घेणे शक्य होत होते. त्यामुळे रखडलेल्या विकासकामांना गती मिळण्यास मदत झाली होती. प्रभाग समित्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि संबंधित अधिकारी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे विकासकामांबाबत अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची थेट जबाबदारी निश्चित होऊन कामांच्या गुणवत्तेवरही देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.
समित्यांच्या पुनर्गठनानंतर बांधकाम, ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि कृषी या जनतेशी थेट संबंधित विभागांच्या कामांचा एकत्रित आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) निधीचे वाटप झाल्यानंतर या समित्यांच्या माध्यमातून विकासकामांच्या अंमलबजावणीला आणखी वेग देण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत प्रशासनाला प्रभाग समित्यांच्या कार्यपद्धतीसह बैठकांचे वेळापत्रक निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या समित्यांमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील समन्वय वाढून गावपातळीवरील रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी व्यक्त केला. ‘प्रभाग समित्यांमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील दुरावा कमी होऊन विकासकामांना गती मिळेल. गावागावांतील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी या समित्या प्रभावी ठरतील,’ असे जगदाळे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु