प्रभासच्या भारदस्त आवाजात 'राधेश्याम'ची अनोखी झलक प्रदर्शित
हैदराबाद, 23 ऑक्टोबर (हिं.स) बाहुबली अभिनेते प्रभास यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधत बहुचर्च
प्रभास


हैदराबाद, 23 ऑक्टोबर (हिं.स)

बाहुबली अभिनेते प्रभास यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधत बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुभाषी अखिल भारतीय ‘राधेश्याम ’ चित्रपटाची नवीन आणि अनोखी झलक सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आली . ही विशेष चित्रफीत इंग्रजी भाषेत प्रदर्शित करण्यात आली.

प्रभासच्या भारदस्त आवाजात धीर-गंभीर पार्श्व संगीतासह 1:18 मिनिटांमध्ये विक्रमादित्य पात्राची ओळख करून देण्यात आली आहे. चित्रपटात प्रभास एका हस्तरेखाशास्त्रज्ञची भूमिका साकारत असल्याचे समजते. चित्रपटाची ध्वनीरचना ऑस्कर पुरस्कार विजेते रसुल पुकुट्टी यांनी केली आहे. विक्रमादित्य कोण आहे... याचे आंशिक उत्तर चाहत्यांना प्राप्त झाले आहे.

‘राधेश्याम ’ चित्रपट 14 जानेवारी 2022 संक्रांतीला हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम, मँड्रिन, जपानी, इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

साहो नंतर जवळपास दोन वर्षांनंतर प्रभासचे पुनरागमन होत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणात युरोपच्या विविध भागात करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना संकटात, 10 अंश थंड तापमान आणि पाऊस अशा स्थितीत चित्रपटाच्या समूहाने चित्रिकरणाचामोठा भाग पूर्ण केला.

जन्मदिनाचे निमित्त साधत प्रभासच्या चित्रपटातील सहकार्यांनी, निर्मिती संस्थांनी आणि अनेक मान्यवरांनी, रसिक तसेच चाहत्यांनी सामाजिक माध्यमांद्वारे प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मागिल वर्षी प्रभासच्या जन्मदिनी 23 ऑक्टोबरला ‘ बिट्स ऑफ राधेश्याम ’ नावाने एक संगीतमय भेट चाहत्यांना देण्यात आली होती. राधेश्याम या प्रेमकथेत विक्रमादित्याच्या रुपात प्रभास दिसणार आहेत. चित्रपटात पूजा हेगडे ‘प्रेरणा’ ही भूमिका साकार करीत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात जागतिक प्रेम दिनानिमित्त ‘राधेश्याम ’ चित्रपटाची नवीन झलक पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती . या संगीतमय झलकीद्वारे प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या पात्रांचा परिचय करून देण्यात आला.

राधेश्यामच्या हिंदी गाण्यांसाठी मिथुन आणि मदन भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेसाठी संगीत दिग्दर्शक जस्टीन प्रभाकर यांची निवड करण्यात आली आहे.

दिग्दर्शक राधाकृष्ण कुमार यांच्या राधेश्याम चित्रपटात, सचिन खेडेकर प्रियदर्शी पुलीकोंडा, भाग्यश्री, जगपती बाबू, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर, रिद्धी कुमार, साशा छेत्री, सत्यान, दिसणार आहे.

‘राधेश्याम ’ चित्रपटाची सहनिर्मिती आणि प्रस्तुती कृष्णम् राजू यांच्या गोपीकृष्ण मुव्हीज या संस्थेअंतर्गत केली आहे. या चित्रपटात कृष्णम् राजू आणि प्रभास अनेक वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत. प्रभास आणि कृष्णम् राजू यांनी ' बिल्ला ' आणि ' रिबेल ' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.चित्रपटात यु व्ही क्रीएक्शन आणि भूषण कुमार यांची टी-सिरीज संस्था आणि अनिल थडानी यांची एए फिल्म्स सुद्धा सहभागी आहे.

प्रभास सध्या अमिताभ बच्चन- दीपिका पदुकोण-दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या प्रोजेक्ट के, दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुष, प्रशांत नील यांच्या सलार आणि राधाकृष्ण कुमार यांच्या ‘राधेश्याम' चित्रपटात व्यस्त आहेत. यासोबत ते दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ' स्पिरिट ' चित्रपटात काम करणार आहे. प्रभासाचा हा 25 वा चित्रपट आहे. ' स्पिरिट ' चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेसह मँड्रिन, कोरियन आणि जपानी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांच्या टी-सीरीज आणि भद्रकाली पिक्चर्स द्वारे केली जाणार आहे.

साहो

बाहुबली नंतर जवळपास दोन वर्षानंतर 2019 साली वर्षी साहो हा प्रभासचा पहिलाच चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. साहोला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतरही चित्रपटाने 400 कोटींची कमाई केली. बाहुबलीच्या अभूतपूर्व यशानंतर साहो तेलुगू सोबतच तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला . महत्वाची बाब म्हणजे साहो चित्रपटासाठी प्रभासने हिंदीचे प्रशिक्षण घेतले आणि स्वतः हिंदी भाषेतून संवाद म्हटले.

साहो चित्रपटात प्रभाससह श्रद्धा कपूर, मंदिर बेदी, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, अरुण विजय, चंकी पांडे आणि लाल सारखे कलाकार होते. साहो ची निर्मिती यु व्ही क्रीएक्शन या प्रमुख निर्मिती संस्थेच्या अंर्तगत झाली असून टी सिरीज आणि अनिल थडानी यांची संस्था ए. ए फिल्म्स सुद्धा या चित्रपटात सहभागी होते तर दिग्दर्शन सुजीत रेड्डी यांचे होते.

प्रभास आणि अखिल भारतीय बाहुबली

दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी अभिनेते प्रभास यांच्यासोबत साकारलेल्या ' बाहुबली' या अभूतपूर्व निर्मितीने भाषा, प्रांत, संस्कृती आणि देशाच्या सीमा ओलांडल्या आणि भारतीय चित्रसृष्टीत नवनवे विक्रम स्थापन केले आणि संपूर्ण विश्वास मोहून टाकले.

बाहुबली चित्रपटाने प्रभास, राणा दग्गुबाटी, अनुष्का शेट्टी, रम्या कृष्णन , सत्यराज आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना अभूतपूर्व यश, प्रसिद्धी आणि नागरिकांचे प्रेम मिळाले. अभिनेते प्रभास आणि दिग्दर्शक एस एस राजमौली यांनी या चित्रपटासाठी 4 वर्ष सोबत काम केले होते.

दोन भागांमध्ये प्रदर्शित झालेल्या बाहुबली चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीस नव्या उंचीवर नेवून ठेवले सोबतच दोन हजार कोटींपेक्षा जास्त कमाई देखील केली. एस. एस. राजमौली यांच्या बाहुबली चित्रपटानंतर सर्व अभिनेत्यांच्या चाहत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एस. एस राजमौली यांचा बाहुबली चित्रपट प्रदर्शित होऊन वर्षे लोटली तरीही जगभातील लोकांमध्ये चित्रपटाबाबत असलेली उत्सुकता आणि आकर्षण कमी झालेले नाही.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande