'हॅशटॅग तदेव लग्नम'मध्ये झळकणार सुबोध भावे - तेजश्री प्रधान
मुंबई, 3 जून (हिं.स.) : शुभम फिल्म प्रॉडक्शन निर्मित, आनंद गोखले दिग्दर्शित 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा क
सुबोध भावे - तेजश्री प्रधान


मुंबई, 3 जून (हिं.स.) : शुभम फिल्म प्रॉडक्शन निर्मित, आनंद गोखले दिग्दर्शित 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा कौटुंबिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला असून या चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नावावरूनच हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणारा दिसतोय. मात्र या चित्रपटात काय पाहायला मिळणार, हे चित्रपट आल्यावरच कळेल. शेखर मते निर्मित या चित्रपटाची कथा आणि पटकथा आनंद दिलीप गोखले यांचीच आहे. या चित्रपटासाठी मंदार चोळकर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गीतलेखन केलं आहे तर पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, '' नुकतीच आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली असून सध्या चित्रपटाबद्दलच्या अनेक गोष्टी पडद्याआड आहेत. लग्नसंस्थेवर आधारित जरी हा चित्रपट असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. एका परिपक्व नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकणारी ही कथा आहे. यापूर्वी असा विषय क्वचितच कोणी हाताळला असेल. हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक आणि सहकुटुंब बघावा, असा हा सिनेमा असून लवकरच हा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. यात अनेक नामांकित कलाकार आहेत. '' तर, निर्माते शेखर मते म्हणतात, ''हा विषय मला ऐकता क्षणीच भावाला आणि त्वरित या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना हा विषय निश्चितच आवडेल.''

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande