नवी मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विकास बघता वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा करण्याकरिता महानगरपालिकेने नियोजन सुरु केले आहे. त्यादृष्टीने आवश्यक वाढीव पाणी हे पाताळगंगा नदीतून तसेच भिरा येथील टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती केल्यानंतर विसर्ग होणाऱ्या अवजलामधून उपलब्ध होणेबाबतचा प्रस्ताव महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचेमार्फत कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांचेकडे पाठविण्यात आलेला आहे. याद्वारे नवी मुंबई शहराची पाण्याची वाढती गरज भागविली जाणार आहे.
सद्यस्थितीत दैनंदिन 450 द.ल.लि. क्षमता असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पाद्वारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नवी मुंबई हे सुनियोजित शहर असून त्यानजिक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच ट्रान्स हार्बर लिंकिग रोड, सिडकोमार्फत राबविण्यात येणारी सामुहिक गृहनिर्माण योजना (Mass Housing Scheme) यासारख्या विविध पायाभूत विकास प्रकल्पांची उभारणी होत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारती तोडून पुनर्विकासाची कामेही महानगरपालिका क्षेत्रात सुरु आहेत.
याशिवाय शासनाच्या नवीन UDCPR मधील तरतुदीप्रमाणे Variable FSI मुळे आणि ठाणे जिल्हयातील 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत नव्याने समावेश झाल्याने महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येत मोठया प्रमाणात वाढ होणार आहे.
अशा सर्व बाबींचा विचार करुन नवी मुंबई शहराचा झपाटयाने होणारा विकास पाहता, भविष्यातील वाढणाऱ्या लोकसंख्येस सद्यस्थितीतील जलस्त्रोत व त्याद्वारे होणारा दैनंदिन पाणी पुरवठा अपुरा पडणार आहे. सन 2055 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 44.20 लक्ष इतक्या वाढीव लोकसंख्येस साधारणत: 1175.00 द.ल.लि. पाण्याची गरज भासणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहराच्या पाणी पुरवठयाकरिता नवीन जलस्त्रोत शोधण्यासाठी प्राथमिक सल्लागाराची नेमणूक केलेली आहे. तसेच नवीन जलस्त्रोताकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आलेली आहे.
या समितीने नवीन जलस्त्रोत निर्मितीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने पाताळगंगा नदीतून व भिरा येथील टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती केल्यावर विसर्ग होणाऱ्या अवजलामधून पाणी उपलब्ध होण्यास पर्यायांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे सयुक्तिक राहील असे सूचविले आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने नेमणूक केलेल्या सल्लागाराने नवीन जलस्त्रोतासाठी प्राथमिक संकल्पना अहवाल (Concept Cum pre-Feasibility Report) महानगरपालिकेस सादर केलेला आहे.
सदर बाबीस आयुक्त तथा प्रशासक यांची 11 सप्टेंबर 2024 रोजी ठराव क्र.6801 अन्वये प्रशासकीय मंजूरी प्राप्त झालेली आहे. तसेच नवीन जलस्त्रोत प्रकल्प अंमलबजावणीकरिता निर्माण होणारे गुंतागुंतीचे तांत्रिक प्रश्न, आधुनिक तंत्रज्ञानाची गरज, पर्यावरणविषयक अभ्यास, सुसाध्यतेची पडताळणी तसेच संशोधनात्मक अभ्यास, कायदेविषयक, अर्थविषयक अन्वेषण अशा विविध बाबींकरीता अनुभवी तज्ज्ञ तांत्रिक सल्लागाराच्या निवडीकरीता महानगरपालिकेमार्फत निविदा प्रसिद्ध करणेत आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी सन 2055 सालापर्यंत आवश्यक असणारी प्रतिदिन एकूण पाणी मागणी 1175.00 द.ल.लि. पूर्ण करणेकरिता सध्या मोरबे धरण व एमआयडीसी यांचेकडून उपलब्ध होणारे 65 द.ल.लि. पाण्याव्यतिरिक्त महानगरपालिकेस साधारणत: प्रतिदिन 700.00 द.ल.लि. इतक्या वाढीव पाणी आरक्षणाची आवश्यकता आहे. हे वाढीव पाणी आरक्षण पाताळगंगा नदीतून व भिरा येथील टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मिती केल्यानंतर विसर्ग होणाऱ्या अवजलामधून उपलब्ध होणेबाबतचा प्रस्ताव महानगरपालिकेमार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांचे कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठविण्यात आलेला असून, त्याचा पाठपुरावा अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे यांचेमार्फत सुरु आहे. सदर प्रस्तावास कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची (KIDC) तत्वत: मान्यता प्राप्त होताच पुढील अनुषंगिक कार्यवाही करणे महानगरपालिकेस शक्य होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भविष्यातील विकास आणि वाढणारी संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन महानगरपालिकेने आवश्यक पाणी पुरवठयाच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गतीमान पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने