नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर (हिं.स.) - स्वच्छता ही केवळ एका व्यक्तीची अथवा कुटुंबाची जबाबदारी नाही, तो केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नाही, तर तो सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘मी माझा परिसर स्वच्छ ठेवेन’, असा मंत्र प्रत्येक नागरिकाने अंगिकारला पाहिजे असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी आज दिल्लीत लहान शाळकरी मुलांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आणि स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनी मुलांकडून स्वच्छतेची प्रतिज्ञाही वदवून घेतली.
स्वच्छतेच्या फायद्यांविषयी पंतप्रधानांनी विचारल्यावर, विद्यार्थ्याने आजारांपासून बचाव आणि स्वच्छ व निरोगी भारताप्रति जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाचा उल्लेख केला. शौचालय नसल्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचा उल्लेखही एका विद्यार्थ्याने केला. मोदी म्हणाले की, बहुतांश लोकांना पूर्वी नाईलाजाने उघड्यावर शौचास जावे लागत होते, ज्यामुळे अनेक आजार पसरले जात होते आणि महिलांसाठी ते अत्यंत गैरसोयीचे होते. पंतप्रधानांनी सांगितले की स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्वप्रथम पावले उचलण्यात आली ज्यामध्ये शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्यात आली आणि परिणामी त्यांच्या गळतीचे प्रमाण झपाट्याने कमी झाले.
पंतप्रधानांनी आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देखील चर्चा केली. मोदी यांनी योगाभ्यास करणाऱ्या तरुणांच्या वाढत्या संख्येबद्दल समाधान व्यक्त केले आणि आसनाचे लाभ देखील अधोरेखित केले. काही मुलांनी पंतप्रधानांना काही आसनांचे प्रात्यक्षिकही करून दाखवले , ज्याचे सर्वानी टाळ्या वाजवून कौतुक केले. त्यांनी चांगल्या पोषणाच्या आवश्यकतेवर देखील भर दिला. पंतप्रधानांनी पीएम-सुकन्या योजनेबद्दल चौकशी केल्यावर, एका विद्यार्थ्याने या योजनेची सविस्तर माहिती दिली आणि सांगितले की यामुळे मुलींना बँक खाते उघडण्यात मदत मिळते जेणेकरून मुली सज्ञान झाल्यावर त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की मुलींचा जन्म होताच पीएम सुकन्या समृद्धी खाते उघडता येऊ शकते आणि प्रत्येक वर्षी 1000 रुपये जमा करण्याचे सुचवले जे पुढील आयुष्यात शिक्षण आणि लग्नासाठी वापरता येऊ शकतात. हीच ठेव 18 वर्षात 50,000 रुपयांपर्यंत वाढेल आणि सुमारे 32,000 ते 35,000 रुपये व्याज मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. मुलींना 8.2 टक्के व्याज मिळते असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी मुलांनी तयार केलेल्या एका स्वच्छता विषयक प्रदर्शनाला भेट दिली. गुजरातमधील एका शाळेतील प्रत्येक मुलाला एका रोपट्याची जबाबदारी दिली होती त्याबद्दलचा एक अनुभव त्यांनी सांगितला. प्रत्येक मुलाने आपापल्या घरून थोडे पाणी नेऊन आपल्या झाडाला द्यायचे होते . 5 वर्षांनी पंतप्रधानांनी त्या गावाला भेट दिली तेव्हा त्या गावाचा कायापालट झालेला त्यांनी पाहिला. कंपोस्ट तयार करण्यासाठी घरगुती कचऱ्याच्या वर्गीकरणाचे महत्व पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले व आपापल्या घरी देखील असा प्रकल्प राबवण्यासाठी प्रोत्साहित केले. प्लास्टिक च्या अतिवापराचे दुष्परिणाम सांगून प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला.
मुलांशी आणखी गप्पा मारताना त्यांनी भिंतीवर लावलेल्या गांधीजींच्या चष्म्याकडे बोट दाखवून सांगितले, कि आपण स्वच्छता ठेवतो कि नाही यावर गांधीजी लक्ष ठेवून असतात. गांधीजींनी आयुष्यभर स्वच्छतेसाठी काम केले असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य आणि स्वच्छता यामधील एक गोष्ट निवडण्यास जेव्हा गांधीजींना सांगितले, तेव्हा त्यांनी स्वच्छतेची निवड केली . कारण त्यांना स्वच्छता सर्वात प्रिय होती, असा एक किस्सा पंतप्रधानांनी मुलांना सांगितला. स्वच्छता ही केवळ एक मोहीम आहे की दैनंदिन कार्यक्रम आहे असे त्यांनी मुलांना विचारले, तेव्हा तो दैनंदिन कामाचाच एक भाग असल्याचे सर्व मुलांनी एका स्वरात सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी