आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या - 'काय करावे आणि काय करू नये'
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’म्हटल
Election commission of India


महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे.

आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’आणि ‘काय करू नये’याबाबत काही महत्त्वाची तत्वे सांगितलेली आहेत. जाणून घेऊया याबाबतची माहिती.

काय करावे ?

निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूर, अवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवता येईल. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रकमेची किंवा इतर वैद्यकीय मदत देता येईल. मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणे निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना / निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्षपातीपणे उपलब्ध झाली पाहिजे. त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना / निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्षपातीपणे करता आला पाहिजे. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका ही त्यांची धोरणे, पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी. शांततापूर्व आणि उपद्रवरहित गृहस्थजीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तींचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा. स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धक किंवा इतर सुविधांचा वापर करण्याची परवानगी मिळवावी आणि ते वापरण्याच्या नियमांचे पालन करावे. सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या, सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. मिरवणूक सुरू होण्याची तसेच संपण्याची वेळ व जागा आणि ती जिथून जाणार असेल तो मार्ग अगोदर निश्चित करून पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये. मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजितरितीने पार पाडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे.

सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्र ठळकपणे लावावेत आणि मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या अनौपचारिक ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये. प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहने चालवण्यावरील निर्बंधाचे पूर्णत: पालन करण्यात यावे. मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक / मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळवलेल्या व्यक्तींनाच कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करता येईल. इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी ( उदा.मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, किंवा आमदार इत्यादी) तिला अटीतून सूट मिळणार नाही.

निवडणूका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किंवा समस्या, आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्र, प्रक्षेत्र दंडाधिकारी, भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात. निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकार, जिल्हा निवडणूक अधिकारी याचे निवडणुकीच्या विविध पैलूंशी संबंधित असलेल्या सर्व बाबींविषयचे निर्देश, आदेश, सूचना यांचे पालन करण्यात यावेत. आपण एखाद्या मतदारसंघातील मतदार किंवा उमेदवार किंवा त्या उमेदवारांचा निवडणूक प्रतिनिधी नसाल तर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आपण त्या मतदारसंघातून निघून जावे.

काय करू नये ?

निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन करताना राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना सत्ताधारी पक्ष / शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे. उमेदवार आणि मतदानासाठी आलेला मतदार यांच्याशिवाय इतर कोणाही मंत्र्याला मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करता येणार नाही. शासकीय काम आणि निवडणूक मोहीम / निवडणूक प्रचार यांची सरमिसळ करू नये. मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करू नये. वेगवेगळ्या जाती, समूह आणि धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष, तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासाठी करू नये. मतदारांना लाच देणे, दारुचे वाटप करणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण वा धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासांत सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या गोष्टींना मनाई आहे. लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब केला जाणार नाही.

स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटवण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही. (असे साहित्य आढळून आल्यास ते निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून त्यांच्याकडे जमा करावे) यामध्ये खासगी व सार्वजनिक मालमत्ता या दोहोंचाही समावेश आहे. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये. मिरवणुकीतील लोकांनी, क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगू नयेत. इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करू नयेत.

मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये. ध्वनिवर्धकांचा सकाळी ६:०० पूर्वी किंवा रात्री १०:०० वाजेनंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय वापर करण्यात येऊ नये. संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्यामध्येही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा / मिरवणुका रात्री १०:०० नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये आणि त्याशिवाय त्याचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती सणासुदीचा मोसम, परीक्षेचे दिवस इत्यादीसारख्या परिस्थितीच्या अधीन असेल. निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप केले जाणार नाही.

ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदान केन्द्र असलेल्या जागेच्या परिसरात (१०० मीटर्सच्या आत) प्रवेश करणार नाही तसेच अशी कोणतीही व्यक्ती, मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीरीवर्गासह मतदारसंघामध्ये फिरणार नाही. जर सरकारी सुरक्षा पुरविलेली व्यक्ती, मतदार असेल, तर केवळ मतदान करण्यासाठी सोबत असलेल्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह त्याच्या तिच्या ये- जा करण्यावर निर्बंध घालीन.

ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरवली आहे किंवा त्या व्यक्तीकडे खासगी सुरक्षा रक्षक आहेत, अशा कोणत्याही व्यक्तीची निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये. मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाजवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये.

आचारसंहितेच्या या तत्त्वांचा भंग झाल्याचे नागरिकांना आढळल्यास त्यांनी सी-व्हिजील ॲपवर ध्वनीमुद्रण, ध्वनीचित्रमुद्रण या माध्यमातून तक्रार करता येईल.

चला, तर मग.. या विधानसभा निवडणूकीत आपण सर्व मिळून आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन ही निवडणूक न्याय व निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करु या !

संकलन

जिल्हा माहिती अधिकारी, धुळे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande