मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरूण आणि मुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेलं भूत यांच्यातील धमाल गोष्ट 'एक डाव भूताचा' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने एक डाव भूताचा या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांनी गाणी गायली आहेत. एक भूत मुक्ती मिळवण्यासाठी एका तरुणाच्या आयुष्यात येतं. मुक्ती मिळवून देण्याच्या बदल्यात त्या तरुणाचं प्रेम असलेली तरुणी त्याला मिळवून देण्याचा डाव तरुण आणि भूत यांच्यात ठरतो. त्यामुळे भूताला मुक्ती मिळते का ? तरुणाला त्याचं प्रेम मिळतं का ? याची धमाल गोष्ट एक डाव भूताचा या चित्रपटात आहे. या गोष्टीला प्रेमकथा, विनोदाची रंजक फोडणीही असून अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात आहे. चित्रपटाविषयीची उत्सुकता निश्चितच वाढली आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मेघा माने