मुंबई, 13 डिसेंबर, (हिं.स.)। 'बेबी जॉन' या आगामी हिंदी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती आणि सिनेमाची चर्चा तर जोरदार रंगली. नुकतंच वरुण धवन, वामिका गब्बी, प्रेझेंटर अटली आणि निर्माता मुराद खेतानी आणि प्रिया अटली यांनी पुण्यात मोठ्या प्रमाणावर जमलेल्या चाहत्यांच्या उपस्थितीत या कौटुंबिक मनोरंजन करणा-या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला.
कालीस यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘बेबी जॉन’ या सिनेमाच्या टीझकमध्ये बेबी जॉनच्या जगाची झलक दाखवतो, जो ऍक्शन, मनोरंजन, क़ॉमेडी आणि डान्सच्या जबरदस्त ट्रॅकचा दमदार कॉम्बिनेशन आहे. प्रसिद्ध संगीतकार एस. थमन यांनी दिलेले संगीत आणि पार्श्वसंगीत (बीजीएम) ट्रेलरला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आणखी वाढलेली दिसून आली.
वरुण धवनच्या दमदार एन्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले, तर आधीच लोकप्रिय ठरलेल्या नैन मटक्का गाण्यावर वामिका गब्बीसोबत त्याने केलेल्या भन्नाट डान्स मूव्ह्जनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. ट्रेलर लॉन्चचं एकंदरीत वातावरण खूपच उत्साहवर्धक होतं. फॅन्सनी गुड वाइब्स ओनलीच्या घोषणा देत माहोल अजूनच खास बनवला होता.
या सिनेमाविषयी व्यक्त होताना वरुण धवन म्हणाला की, “'बेबी जॉन'चा मी एक भाग होता आला मला खूप आनंद आहे. हा सिनेमा खूपच भावनिक आहे आणि स्टोरीलाईन बद्दल म्हणायचं तर हा सिनेमाच खूप पॉवरफुल जर्नी आहे. यामधील पात्रं साकारण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. ट्रेलरमध्ये या कथेची तीव्रता आणि झलक पाहायला मिळते. या प्रोजेक्टवर काम करणे खरोखरच खास होते, आणि ही कथा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे.
सिने 1 स्टुडिओचे निर्माते मुराद खेतानी म्हणाले, बेबी जॉनच्या माध्यमातून आम्हाला असा एक सिनेमा बनवायचा होता जो ऍक्शन आणि मानवी भावना यांचा सुंदर संगम दाखवेल. बेबी जॉन आमच्या प्रेमाचा आणि मेहनतीचा परिणाम आहे. आज प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे मला खात्री आहे की हा सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल. आम्ही हा सिनेमा जगासमोर सादर करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. अद्वितीय टीमसोबत काम करून तयार झालेल्या या सिनेमाचा आम्हाला खूप अभिमान आहे.
प्रेजेंटर अटली म्हणाले, बेबी जॉन ही एक खूप महत्त्वाची आणि आजच्या काळाला साजेशी कथा मांडते. हा एक मनोरंजनपूर्ण कौटुंबिक सिनेमा आहे, पण महिलांच्या सुरक्षेसारख्या गंभीर विषयांवरही प्रकाश टाकते, जे आजच्या समाजासाठी मोठ्या चिंतेचा विषय आहे. याशिवाय, हा सिनेमा पालकत्वाच्या परिणामांवर भर देत आहे. चांगल्या आणि वाईट वडिलांमधील फरक दाखवत, चांगले पालकत्व समाजाला कसे सकारात्मक स्वरूप देऊ शकते, हे अधोरेखित करते. या अर्थपूर्ण प्रोजेक्टचा भाग होऊन मला खूप अभिमान वाटतो.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मीडिया आणि कंटेंट बिझनेसच्या अध्यक्ष ज्योती देशपांडे म्हणाल्या, 'बेबी जॉन हा एक उत्कृष्ट मसाला, मनोरंजनाने भरलेला सिनेमा आहे, ज्यामध्ये थरारक ऍक्शन, हृदयाला स्पर्श करणारा ड्रामा, मजेशीर क्षण आणि रोमान्सचा समावेश आहे. हे सर्व मिळून हा सिनेमा कुटुंबासोबत या सुट्ट्यांच्या हंगामात पाहण्यासाठी उत्तम निवड नक्कीच ठरते. ऍक्शन आणि भावना यांच्यात सुंदर संतुलन साधण्यात एटली आणि कालीस यांचं कौशल्य, वरुणची अप्रतिम ऊर्जा आणि थमनचे जबरदस्त संगीत यांचा उल्लेखनीय सहभाग आहे. जिओ स्टुडिओसाठी 2024 हे एक अविस्मरणीय वर्ष ठरले आहे, आणि आम्ही या वर्षाचा शेवट 'बेबी जॉन'सारख्या खास सिनेमाने करण्यासाठी उत्सुक आहोत. प्रेक्षकांसाठी हा आणखी एक अद्वितीय आणि आनंददायक सिनेमा अनुभव असेल.'
'बेबी जॉन' हा सिनेमा वरुण धवन, राष्ट्रीय पुरस्कार विजेती कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव यांच्या प्रमुख भूमिकांमुळे चर्चेत आहे. मुराद खेतानी, प्रिया अटली आणि ज्योती देशपांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. अटली आणि सिने1 स्टुडिओज यांच्या सहकार्याने जिओ स्टुडिओजने प्रस्तुत केलेला हा सिनेमा एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देणारा ठरणार आहे, जो न चुकता, सिनेमागृहात अनुभवायालाच हवा. ए फॉर ऍपल स्टुडिओज आणि सिने स्टुडिओज यांनी तयार केलेला, कालीस यांनी दिग्दर्शित केलेला 'बेबी जॉन' 25 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर