सिकलसेल आजाराबाबत जनजागृती सप्ताह सध्या सुरु आहे. १७ डिसेंबरपर्यंत हा सप्ताह सुरु राहणार आहे. हा सप्ताह संपूर्ण जिल्हयात सर्व आरोग्य संस्थामध्ये सिकलसेल आजाराची तपासणी व मार्गदर्शन शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांनी सिकलसेलसाठी रक्त तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांनी केले आहे.
सिकलसेल आजार म्हणजे नक्की काय?
सिकलसेल आजार हा अनुवांशिक असून आई-वडिलापासून अपत्यांना होतो. सिकलसेल हा रक्त पेशीशी संबधीत आजार आहे. सामान्य रक्तपेशी या वर्तुळाकार व लवचिक असतात; तर सिकलसेल रक्तपेशी या विळ्याच्या आकारच्या व ताठर असतात. सशक्त लाल रक्त पेशी रक्तवाहीन्यातून सरळ निघुन जातात, परंतु सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी वाहिन्याला चिकटून राहतात. त्यामुळे लवकरच अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो. त्याला सिकलसेल Crisis म्हणतात. यामुळे असह्य वेदना होतात. अशी इजा वारंवार झाल्यामुळे अवयवाला जबरदस्त इजा होऊन तो अवयव निकामी होतो.
प्लीहा (Spleen) मध्ये नष्ट झालेल्या रक्तपेशी जमा होतात, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी अडकल्यामुळे प्लीहेवर जबरदस्त सूज येते,त्याची कार्यक्षमता कमी होते आणि आजाराविरुद्धची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे आजारांचे प्रमाण अधिक वाढते.
ज्या-ज्या भागात रक्तपुरवठा खंडित होतो, त्या-त्या भागातील अवयवांना इजा होत असते. त्यामुळे सिकलसेल रुग्णांची हाडे, फुफ्फुस, यकृत, प्लीहा, मेंदु प्रामुख्याने बळी पडतात व आजारांची गंभीरता वाढल्याने त्याचा मृत्यू होऊ शकतो. हे सर्व नकळत होऊन आपल्याला उपचारासाठी वेळही मिळत नाही. याशिवाय डोळे, स्वादुपिंड, त्वचा, पित्ताशय सुद्धा प्रभावित होऊ शकतात.
सिकलसेलचे प्रकारः-
सिकलसेल आजाराचे दोन प्रकार आहेत.पहिला प्रकार म्हणजे 'वाहक' (AS) तर दुसरा प्रकार म्हणजे 'रुग्ण' (SS). या आजाराला प्रतिबंध करायचा असेल तर वाहक-रुग्ण, वाहक-वाहक, रुग्ण-रुग्ण यांनी आपआपसात विवाह करुन नये. कारण अशा विवाहांमुळे होणारे अपत्य हे सिकलसेल वाहक किंवा रुग्ण होऊ शकते. परंतु सिकलसेलग्रस्त रुग्ण किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह केल्यास अपत्यांना सिकलसेल आजार होण्याचा धोका कमी होऊ शकतो. सिकलसेल हा अनुवांशीक आजार आहे. सिकलसेल आजाराचा संपूर्ण उपचार नाही पण नियंत्रण करणे शक्य आहे. सिकलसेल रुग्णांस नियमित आणि समतोल आहार आवश्यक आहे. सिकलसेल रुग्णांचे योग्य औषधोपचाराने आयुष्य वाढते.
जिल्ह्यात ३७५ वाहक व ७५ रुग्णः-
जिल्हयात मागील वर्षी एकूण २ लाख ३० हजार ६४० व्यक्तिंच्या सिकलसेल तपासण्या झाल्या असून जिल्ह्यात ३७५ वाहक व ७५ सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. सर्व रुग्णांना मोफत औषधोपचार व रक्त पुरवठा करण्यात येत असून याबाबत वेळोवेळी समुपदेशनही करण्यात येते.
सिकलसेलग्रस्त रुग्णांना शासनाकडून मिळणारे अर्थसहाय्य व इतर लाभः-
सिकलसेल रुग्णांना (SS Patern) संजय गांधी निराधार योजने अंतर्गत शासनाचा आर्थिक लाभ मिळतो. इयत्ता १० वी व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्षेच्या वेळी प्रत्येक तासाला २० मी. अधिक अवधी दिला जातो. सिकलसेल रुग्णांना उपचाराकरिता बस प्रवासात सवलत दिली जाते.
सिकलसेल आजाराची लक्षणेः-
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, हातापायावर सूज येणे, भूक मंदावणे,सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, लवकर थकवा येणे,चेहरा निस्तेज दिसणे.
सिकलसेल आजारावरील उपचार व नियंत्रण:-
या आजारावर उपचार नाही पण आजाराच्या गंभीर त्रासावर नियंत्रण ठेवता येते. सिकलसेल रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी व रक्त चाचणीची आवश्यकता असते.फॉलिक अॅसिडच्या गोळ्या नियमित घेणे. सोडामिंटच्या गोळयांचे सेवन महत्वाचे असते.भरपूर पाणी पिणे (दररोज ८ ते १० ग्लास), वेदनाशामक गोळ्या, नियमित तपासणी व सल्ला घेणे,गरज भासल्यास रक्त संक्रमण करणे.समतोल आहार घेणे. सिकलसेल रुग्णांनी आहारात विविधता ठेवावी दिवसातून तीन वेळा आहार घ्यावा मासे, अंडी, संत्री,हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, शेंगा, झिंक असलेले पदार्थ खाणे.बोनमॅरो ट्रान्सप्लाटेशन करुन हा आजार पुर्णतः बरा हेऊ शकतो.
प्रतिबंधः-
विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करुनच विवाह करावा. लाल (SS) आणि पिवळे (AS) कार्ड असलेल्यांनी आप-आपसात विवाह टाळावा. सिकलसेलग्रस्त किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह करावा. सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर आठ आठवड्याच्या आत गर्भजल तपासणी करुन घ्यावी.
माहिती स्रोतः आरोग्य विभाग
माहिती संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने