* दुबईत होणार भारत वि. पाकिस्तान सामने
नवी दिल्ली, 14 डिसेंबर (हिं.स.) - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी हायब्रिड मॉडेलचा स्वीकार केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांनी ठेवलेला प्रस्ताव त्यांनी मान्य केला आहे. त्यामुळे स्पर्धेतील भारताचे सामने दुबईत होणार आहेत. वेळापत्रकानुसार आठ संघांची वन डे स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होऊन अंतिम सामना ९ मार्चला होईल.
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ते आयोजित केले जाणार आहे. बीसीसीआयने आयसीसीला आधीच सांगितले होते की, ते या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवणार नाहीत. त्याप्रमाणे आयसीसीने पाकिस्तानला याबाबत माहिती दिली. तेव्हापासून आयसीसी आणि पीसीबी यांच्यात या विषयावर सतत चर्चा सुरू होती. अनेक बैठकांनंतर आयसीसी-बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात उपरोक्त मुद्द्यावर एकमत झाले आहे.
आयसीसीचे उच्च अधिकारी शनिवारी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठकीत २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलवर चर्चा झाली. या बैठकीत भारत किंवा पाकिस्तान हे दोघेही एकमेकांच्या देशांत आयसीसी स्पर्धा खेळणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. त्याऐवजी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे भारताचे सामने दुबईमध्ये खेळवले जातील. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
दरम्यान आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकमेकांच्या देशात खेळणार नाही, असे पीसीबीने स्पष्ट केले. याचा अर्थ असा की जेव्हा भारत २०२५ च्या महिला वनडे वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवणार आहे, तेव्हा पाकिस्तान भारतात येणार नाही आणि तो सामना इतर ठिकाणी खेळेल. या व्यतिरिक्त, २०२६ च्या पुरुष टी-20 वर्ल्ड कप जो भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित केले जातील, पाकिस्तानला देखील भारतात यावे लागणार नाही आणि मोठ्या सामन्यासाठी ते श्रीलंकेला जातील.
आयसीसीच्या बैठकीत ठरल्यानुसार, २०२७ पर्यंत हायब्रिड मॉडेलला मान्यता, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने दुबईत खेळतील, पाकिस्तानचा महिला संघ २०२५ च्या वर्ल्ड कपचे सामने तटस्थ ठिकाणी खेळतील. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे, २०२६च्या पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामन्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी कोलंबो येथे जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कोणतीही भरपाई मिळणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी