मुंबई सागरी मंडळाकडून 'नीलकमल' बोटीचा प्रवासी परवाना आणि प्रमाणपत्रे निलंबित
- क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचा ठपका- मृतांचा आकडा १५ वर मुंबई, २१ डिसेंबर (हिं.स.) : गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीला जाणाऱ्या 'नीलकमल' बोटीला झालेल्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्या अंतर्गत बोटीतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवा
नीलकमल बोट अपघात


- क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचा ठपका- मृतांचा आकडा १५ वर

मुंबई, २१ डिसेंबर (हिं.स.) : गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीला जाणाऱ्या 'नीलकमल' बोटीला झालेल्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्या अंतर्गत बोटीतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याचे स्पष्ट झाले. याची गंभीर दखल घेत मुंबई सागरी मंडळाने 'नीलकमल' बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व्हे प्रमाणपत्र निलंबित केले आहे. तसेच बोटीतील डेकची जबाबदारी असणाऱ्या बोट मास्टर आणि इंजिनची जबाबदारी असणाऱ्या इंजिन ड्रायव्हरची चौकशी सध्या सुरू आहे. यांच्यावरही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतल्याचा ठपका असून चौकशीअंती या दोघांविरोधातही कडक कारवाई करून त्यांचा परवाना प्रमाणपत्र निलंबित करण्याचे संकेत सागरी मंडळाने दिले आहेत.

घारापुरीजवळ प्रवासी बोटीवर नौदलाची स्पीड बोट आदळून बुधवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जलवाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 'नीलकमल' बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने अपघात झाला. मात्र 'नीलकमल' बोटीवरील कर्मचाऱ्यांकडून प्रवासी वाहतुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

'नीलकमल' बोटीची प्रवासी क्षमता ८० प्रवासी आणि सहा कर्मचारी अशी होती. असे असताना या बोटीवर अपघातादरम्यान एकूण ११० प्रवासी आणि ५ कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही बाब गंभीर असल्याने नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व्हे प्रमाणपत्र निलंबित करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही बोटीवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी ही तिन्ही प्रमाणपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. ही तिन्ही प्रमाणपत्रे रद्द झाल्याने 'नीलकमल' बोटी, मालकाविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

बेपत्ता असलेल्या ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह शनिवारी शोधमोहिमेत सापडला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे १५ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघात वाचलेले नाथाराम चौधरी (२२, रा. साकीनाका, मुंबई) यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१)), १२५ (अ) (ब), २८२, ३२४ (३)(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून तक्रारदारासह ११ हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अपघातग्रास्त नीलकमल बोटीची तज्ज्ञांमार्फत तपासणीही केली जाणार आहे. त्यात मेरीटाईम बोर्डाचीही मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय नौदलाकडूनही याप्रकरणी तपासणी करण्यात येणार आहे. पोलीसही या प्रकरणी नौदलाच्या संपर्कात असून त्यांच्याकडून मदत घेतली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande