मुंबई , 29 डिसेंबर (हिं.स.)।प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माती आणि नाटककार, सई परांजपे यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल 'पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. येत्या १५ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित दहावा अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी घोषणा महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम आणि मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी केली.
भारत आणि जगभरातील अद्वितीय चित्रपटांचा वार्षिक सोहळा, 10 वा अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (AIFF 2025) 15 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी, महोत्सवातील सर्वात प्रतिष्ठित सन्मान - पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सई परांजपे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष लतिका पाडगावकर (पुणे) या असून चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचाही समितीत समावेश होता. पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या महोत्सवाचे १५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे उद्घाटन होणार आहे. चित्रपट महोत्सव ता. १९ जानेवारीपर्यंत द आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होणार आहे. नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण केंद्र व मराठवाडा आर्ट कल्चर, फिल्म फाउंडेशन, केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय आणि राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग यासाठी सहकार्य करीत आहे.
चार दशकांहून अधिक काळापासून परांजपे या भारतीय सिनेजगतात कार्यरत आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी सिनेमांनी भारतीय सिनेजगताला वेगळी ओळख प्राप्त करून दिली. त्यांचे चित्रपट त्यांच्या खोल भावनिक स्पर्श आणि मानवी नातेसंबंधांवर अंतर्दृष्टीपूर्ण भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. स्पर्श (1980), चष्मे बद्दूर (1981), कथा (1983), दिशा (1990), चूडियाँ (1993), आणि साझ (1997) यामध्ये त्यांचा काही उल्लेखनीय कामांचा समावेश आहे. चित्रपट दिग्दर्शनाव्यतिरिक्त, श्रीमती परांजपे यांनी अनेक महत्त्वपूर्ण नाटके आणि बालनाट्यांचे दिग्दर्शन केले आहे.त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल, भारत सरकारने परांजपे यांना 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच त्यांना फिल्मफेअर पुरस्कार आणि महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार यांसारख्या प्रशंसेनेही गौरविण्यात आले आहे. शिवाय, परांजपे यांनी चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया (CFSI) चे अध्यक्ष म्हणून सलग दोन वेळा काम केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash