नाट्य रसिकांना आता निकालाचे वेध
- राज्य नाट्य स्पर्धा निकालाचा बंद लिफाफा आयोजकांकडे सुपूर्द अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.) राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित नाट्य स्पर्धा आटोपली असून, या स्पर्धेचा निकाल आयोजन समितीचे समन्वयक विशाल फाटे व सहसमन्वयक कोमल तायडे यांच्या स्वा
नाट्य रसिकांना आता निकालाचे वेध:राज्य नाट्य स्पर्धा निकालाचा बंद लिफाफा आयोजकांकडे सुपूर्त‎


- राज्य नाट्य स्पर्धा निकालाचा बंद लिफाफा आयोजकांकडे सुपूर्द

अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.) राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित नाट्य स्पर्धा आटोपली असून, या स्पर्धेचा निकाल आयोजन समितीचे समन्वयक विशाल फाटे व सहसमन्वयक कोमल तायडे यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

परंपरेनुसार हा निकाल परीक्षकांतर्फे बंद लिफाफ्यात सोपवला जातो. त्यानंतर समन्वयकांमार्फत ते राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाकडे पाठवण्यात येतो. त्यानंतर निकालाची घोषणा मुंबईतून केली जाते. त्यामुळे या स्पर्धेत सादर झालेल्या सर्व नाटकांमधील नाट्य कलावंतांना निकाल घोषित होण्याची प्रतीक्षा लागली आहे. या वर्षीची ६३ वी राज्य नाट्य स्पर्धा येथील सिपना महाविद्यालयाच्या अरविंद लिमये सभागृहात घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण १४ नाटके सादर झाली. दररोज सायंकाळी ७ वाजता एक याप्रमाणे ही नाटके सादर झाली.

स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. शशिकांत चौधरी कोल्हापूर, आबासाहेब शिंदे छत्रपती संभाजीनगर आणि कीर्ती मानेगावकर नागपूर यांनी केले. समारोप समारंभाला चित्रपट आणि टीव्ही सिरियलचे निर्माते विशाल खिरे मुंबई आणि संजीवनी पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते. या स्पर्धेत मोठ्यांचा शेक्सफियर, आला रे राजा, पुत्रकामेष्ठी, काली, थलाई कुत्थल, उत्खनन, अनिमा, होमीसाईड, कमला, अंधारडोह, दसवा ही नाटके सादर झाली होती. सिपना महाविद्यालयातील वातानुकुलीत आणि सुसज्ज सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेचा निकाल कधी घोषित होतो, याकडे सर्व नाट्यरसिकांच्या नजरा लागल्या आहेत.

बालनाट्य स्पर्धा २६ जानेवारीपासून राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन अमरावती जिल्हा मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी तथा विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख प्रा. एम. टी. उर्फ नाना देशमुख, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संघटनेचे विश्वस्त ॲड. प्रशांत देशपांडे आणि माहिती अधिकार व्याख्याते ॲड. राजेंद्र पांडे उपस्थित होते. दरम्यान याच स्पर्धेचा पुढचा भाग असलेली बालनाट्य स्पर्धा २६ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे समन्वयक विशाल फाटे यांनी सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande