मुंबई , 30 डिसेंबर (हिं.स.)।अभिनेता विक्रांत मेस्सी याची प्रमुख भूमिका असलेला 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता. 15 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात हाताळण्यात आलेला विषय अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळेच त्यावर अनेक टीका झाल्या. मात्र आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे.
'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटावर वेगवेगळ्या स्तरातून टीका झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करू शकला नव्हता. आता हाच चित्रपट १० जानेवारी २०२५ पासून ZEE5 या ओटीटी मंचावर पाहता येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरना यांनी केलेले आहे. २००२ साली साबरमती एक्स्प्रेसशी निगडीत असलेल्या गोध्रा हत्याकांडावर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटाची ओटीटीवरील स्ट्रिमिंग डेट समोर आली असली तरी चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
या चित्रपटात विक्रांत मेस्सीने समर कुमार हे पात्र साकारलेले आहे. तर या चित्रपटात राशी खन्ना, रिद्धी डोगरा असे दिग्गज कलाकार आहेत. राशी खन्नाने अमृता गिल तर रिद्धी डोगराने मनिका राजपुरोहित ही पात्रे साकारलेली आहेत. या चित्रपटाची कथा गोध्रा हत्याकांडावर आधरलेली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाल्यापासून त्यावर अनेक स्तरांतून टीका झाली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर ही टीका चांगलीच वाढली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा चित्रपट पाहिलेला आहे. केंद्रीय मंत्र्यांसाठी या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी बडे नेते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash