रत्नागिरी : रामवरदायिनीचा मंगळवारी वार्षिक यात्रोत्सव
रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : चोरवणे (ता. खेड) येथील श्रीरामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव चैत्र पौर
रत्नागिरी : रामवरदायिनीचा मंगळवारी वार्षिक यात्रोत्सव


रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : चोरवणे (ता. खेड) येथील श्रीरामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव चैत्र पौर्णिमेला येत्या मंगळवारी २३ एप्रिल रोजी होणार आहे.

ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानीमातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत व सह्याद्री पर्वतरांगांवर विराजमान झालेल्या अर्थात सतत भक्तगणांवर आशीर्वादाची छत्रछाया ठेवून असलेल्या स्वयंभू नागेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी चोरवणे गाव वसले आहे. निसर्गरम्य गावातील ग्रामदेवतेचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तिभावाने, श्रद्धेने साजरे केले जातात.

देवीचे मंदिर हेमाडपंती असून हे पाषाणी कोरीव काम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे. देवीची मूर्ती कर्नाटक येथून घडवून आणण्यात आली आहे. अशा या जागृत देवीची यात्रा २३ एप्रिल रोजी उत्साहात सुरू होत आहे. सायंकाळी ६ वाजता लाट चढविण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता देवीची आरती झाल्यानंतर रात्री ९ वाजता परिसरातील देवदेवतांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे. देवी-देवतांबरोबर आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि मनोगत रात्री १० वाजता, रात्री ११ वाजता ढोल-ताशांच्या गजरात मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचवत छबिना काढला जाईल. रात्री १२ वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन चोरवणे ग्रामस्थ व ग्रामविकास मंडळ (चोरवणे, मुंबई, पुणे) यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande