नागपूर आणि गोंदियात इव्हीएममुळे मतदानाला उशिर
नागपूर, 19 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, नागपूर, रामटेक या 5
संग्रहित


नागपूर, 19 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, नागपूर, रामटेक या 5 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळ पासून सुरू झाले. यावेळी गोंदिया आणि नागपूरमध्ये काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मतदान सुरू होण्यास उशिर झाला.

नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सुरू झालेल्या मतदानात इव्हीएम मशीन बंद पडल्याने लोकांना तासभर रांगेत उभे राहण्याची वेळ आली. हा प्रकार दिघोरी येथील जयमाता शाळा या मतदान केंद्रावर झाला. येथील बुथ क्रमांक 246 येथे नागरिक सकाळी 6.30 वाजेपासून रांगेत लागले होते. मतदान 7 वाजता सुरू होणार होते. परंतु इव्हीएम मशीन सुरूच होत नव्हते. लोकांमध्ये संताप वाढला होता.

माजी नगरसेवक विजय झलके यांनी यावर आक्षेप घेतला. मतदान अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणीचे कारण देत इव्हीएम मशीन बदलली. सकाळी 8 वाजून 10 मिनीटांनी मतदान सुरू झाले. याच केंद्रावरील बुथ क्रमांक 248 मध्येही सकाळी 7.30 वाजता अचानक इव्हीएम मशीन बंद पडले. मतदान रखडल्याने लोकांनी गोंधळ घातला. त्यानंतर 7 वाजून 45 मिनीटांनी पुन्हा मतदान सुरू झाले. यासोबतच गोंदिया येथेही काही केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. येथील गोरेगाव तालुक्यातील मोहगाव येथील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने सुमारे दीड तास बंद होते. यामुळे नागरिक वैतागले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande