रत्नागिरीत २६ एप्रिलपासून महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा
रत्नागिरी, 20 एप्रिल, (हिं. स.) : महावितरणातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेत
रत्नागिरीत २६ एप्रिलपासून महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा


रत्नागिरी, 20 एप्रिल, (हिं. स.) : महावितरणातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने दरवर्षी नाट्यस्पर्धांचे आयोजन करण्यात येते. महावितरणच्या कल्याण प्रादेशिक विभागांतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा यंदा रत्नागिरी परिमंडलाच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आली आहे. २४ ते २६ एप्रिलदरम्यान रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात ही स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेत प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक, जळगाव या परिमंडलासह प्रकाशगड, मुंबई मुख्य कार्यालय नाट्यसंघाचा सहभाग असणार आहे.

महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नाट्यस्पर्धेचे उद्घाटन होईल. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ‘द रेन इन द डार्क’ हे भांडुप परिमंडलाचे तर दुपारी ३.३० वाजता 'ऑक्सिजन' हे कल्याण परिमंडलाचे नाटक सादर होईल. दुसऱ्या दिवशी, २५ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता 'डबल गेम' हे रत्नागिरी परिमंडलाचे तर दुपारी ३.३० वाजता 'द ग्रेट एक्स्चेंज' हे नाशिक परिमंडलाचे नाटक सादर होईल. अखेरच्या दिवशी २६ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता 'एकेक पान गळावया' हे प्रकाशगड, मुंबई मुख्य कार्यालयाचे तर दुपारी २.३० वाजता 'म्याडम' हे जळगाव परिमंडलाचे नाटक सादर होईल.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महावितरणचे संचालक (संचलन व मानव संसाधन) अरविंद भादीकर यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता होईल. याप्रसंगी संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता परेश भागवत असतील. यावेळी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर (नाशिक परिमंडल), मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके (सांघिक कार्यालय, मुंबई), मुख्य अभियंता धनंजय औढेंकर (कल्याण परिमंडल), मुख्य अभियंता सुनील काकडे (भांडुप परिमंडल), मुख्य अभियंता कैलास हुमणे (जळगाव परिमंडल) उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेला नाट्यरसिकांना प्रवेश विनामूल्य आहे. नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक तथा मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande