शहरात कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत - ठाणे आयुक्त
ठाणे, 20 एप्रिल, (हिं.स.) : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सर्वंकष स्वच्छता अभियान #DeepCleaningCampain
शहरात कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत - ठाणे आयुक्त


ठाणे, 20 एप्रिल, (हिं.स.) : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सर्वंकष स्वच्छता अभियान #DeepCleaningCampaing शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले. या ठिकाणी असलेल्या तानसा पाईप लाईनच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवाव्यात तसेच कचरा न टाकण्याचे फलक लावावेत व परिसरात मार्शलची नेमणूक करावी , तसेच शहरात रस्त्यांच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सर्वंकष स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, तुषार पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवक उपस्थित होते.

तानसा पाईप लाईन परिसर, उपवन तलाव परिसरात कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत, तसेच सुरक्षारक्षक नेमावेत, तसेच ज्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून दोन वेळा उचलला जाईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. तसेच शहरात ज्या ज्या रस्त्याच्या बाजूला पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी उपवन तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून येथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई करण्यात आली. उपवन तलाव येथील पालायदेवी मंदिर, ते उपवन तलाव परिसर, बनारस घट परिसर, माजिवडा नाका ते गांधीनगर पाण्याची टाकी (दुभाजक), येऊर फॉरेस्ट ते रिक्षास्टॅण्ड, वर्तकनगर नाका (तानसा), वसंतविहार शाळा ते महावीर मिलेनियम, सिद्धांचल क्लब हाऊस ते एचडीएफसी बँक आदी परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवशांती प्रतिष्ठान संस्थेसह महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांनी शहर स्वच्छ ठेवणेबाबतची शपथ घेतली.तसेच उपवन येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणा-या झिरो डंपिंग ग्राउंड या वाहनाची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली.

आयुक्तांनी साधला नागरिकांशी संवाद

रस्त्यावर कचरा टाकणा-या नागरिकांना दंड लावावा जेणेकरून नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत तसेच उपवन तलाव येथे जे नागरिक तलावात निर्माल्य टाकतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली. तसेच उपवन तलाव येथे असलेला परिवहनचा थांबा रस्ता रूंदीकरणाच्या कामात काढण्यात आला होता मात्र तो अद्याप बसविण्यात न आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, थांबा नसल्यामुळे बसेस थांबत नाहीत, त्यामुळे सदरचा थांबा बसविण्याची मागणी नागरिकांनी केली, याबाबत कार्यवाही केली जाईल असे आयुक्तांनी यावेळी नमूद केले. महापालिकेच्या माध्यमातून नियमित होत असलेल्या सफाईचे व बदलत असलेल्या ठाणे शहराचे कौतुक करून नागरिकांनी आयुक्तांचे आभार मानले.

मतदानाबाबत जनजागृती

वर्तकनगर परिसरात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून आयुक्त सौरभ राव यांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला. नागरिकांनी 20 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होवून आपला हक्क बजावावा असे आवाहन यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande