'वॉकिंग थ्रू अ सॉन्गलाइन' कला प्रदर्शनाच्या भारत दौ-याला सुरुवात
मुंबई, २० एप्रिल, (हिं. स) म्युझियम ऑफ सोल्युशन्स हे मुलांसाठीचे मुंबईतील अद्वितीय संग्रहालय, मुंबईत
Mumbai 


मुंबई, २० एप्रिल, (हिं. स) म्युझियम ऑफ सोल्युशन्स हे मुलांसाठीचे मुंबईतील अद्वितीय संग्रहालय, मुंबईतील ऑस्ट्रेलियन कौन्सुलेटजनरल आणि भारतातील अनबॉक्स कल्चरल फ्युचर्स ही संस्था यांनी ‘वॉकिंग थ्रू अ सॉन्गलाइन’ (डब्ल्यूटीएएस) या कला प्रदर्शनाच्या भारतातील दौऱ्याला सुरुवात करण्यासाठी आपसांत हातमिळवणी केली आहे. ‘ऑस्ट्रेलियन फर्स्ट नेशन्स’च्या नेतृत्वाखालील हे पुरस्कारांनी नावाजलेले, डिजिटल इमर्सिव्ह कलाप्रदर्शन मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता येथे आयोजित केले जाणार आहे. सर्वप्रथम ते मुंबईत २० एप्रिल ते १० मे या कालावधीत सामान्यजनांसाठी म्युझियम ऑफ सोल्युशन्स आर्ट गॅलरी येथे भरविण्यात येईल. हे प्रदर्शन नॅशनल म्युझियम ऑफ ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियातील मॉस्टर स्टुडिओ यांनी तयार केले आहे.

म्युझियम ऑफ सोल्युशन्स आणि मुंबईतील ऑस्ट्रेलियन कौन्सुलेट-जनरल यांच्यातील भागीदारीमुळे स्वदेशी कलाकृतींचे आणि ऑस्ट्रेलिया व भारताच्या सांस्कृतिक वारशांचे जतन, संवर्धन करण्यासाठी नवीन तांत्रिक पद्धती वापरले जाणारे हे प्रदर्शन भारतीयांसमोर येत आहे. म्युझियम ऑफ सोल्युशन्स येथे भरणाऱ्या या डब्ल्यूटीएएस कला प्रदर्शनामुळे स्वदेशी कलेचे संवर्धन करण्याची एक पद्धत म्हणून डिजिटल संरक्षणाचा अवलंब करण्याच्या भारत व ऑस्ट्रेलियातील सरकारे आणि खासगी कंपन्या यांच्या क्षमता दिसून येणार आहेत. मुंबईतील ऑस्ट्रेलियन कौन्सुलेट-जनरल यांच्यातर्फे साहित्य, चित्रपट, क्रीडा, लैंगिक व महिला सक्षमीकरण, शाश्वतता, सायबरसुरक्षा, एसटीईएम, अपंगत्व आणि एलजीबीटीक्यूआयप्लस अशा अनेक विषयांवर सहयोगी स्वरुपाचे उपक्रम सुरू आहेत, त्यांमध्ये हे प्रदर्शन पूरक ठरणार आहे.

वॉकिंग थ्रू अ सॉन्गलाइन हे अद्भूत फर्स्ट नेशन्स प्रदर्शन लवकरच भारतात येणार आहे याचा मला खूप आनंद आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल म्युझियमद्वारे समर्थित हे प्रदर्शन डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेअर केलेल्या प्राचीन ज्ञान आणि कथांसह चित्रांना जिवंत करते. मुंबईतील सुंदर अशा म्युझियम ऑफ सोल्युशन्स आर्ट गॅलरीमध्ये या शनिवार, दि. २० एप्रिलपासून सुरू होणारे हे प्रदर्शन पुढील काही महिन्यांत भारतातील इतर शहरांमध्ये आयोजित करण्यात येईल,” असे भारतातील ऑस्ट्रेलियाचे उप उच्चायुक्त निकोलस मॅककॅफ्रे यांनी सांगितले.

‘म्युझियम ऑफ सोल्युशन्स’च्या संस्थापिका तन्वी जिंदाल शेटे यांच्या म्हणण्यानुसार,“काही काळापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे देश एकाच पॅंजिया या महाखंडाचा भाग होते. आज हे दोन्ही देश ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांनी बांधले गेलेले आहेत, दोहोंकडील नागरिकांचे परस्पर संबंध निर्माण झालेले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ‘फर्स्ट नेशन्स पीपल्स’च्या सांस्कृतिक वारशाचे अमूल्य दृश्य आपल्याला व विशेषतः तरुण पिढीला पाहता यावे, याकरीता ‘वॉकिंग थ्रू अ सॉन्गलाइन’ आर्ट एक्झिबिशनचे आयोजन ‘मुसो’ येथे होत आहे, ते साकारण्याचे भाग्य मला लाभले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्थानिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी, त्यांच्यातील अधिक सहकार्यासाठी हे अनोखे कला प्रदर्शन उत्प्रेरक भूमिका बजावू शकते.”

मुंबईतील ऑस्ट्रेलियन कॉन्सुल-जनरल पॉल मर्फी म्हणाले, “डब्ल्यूटीएएस प्रदर्शनात प्राचीन ऑस्ट्रेलियन फर्स्ट नेशन्सचे ज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाफ झाला आहे, तसेच शेकडो कलाकारांच्या कलाकृतींचा अर्थ लावण्यात आला आहे. कलाकार, संरक्षक आणि इतिहासकारांनी सांगितल्याप्रमाणे या कथांमधून ऑस्ट्रेलियन खंडाचा मूलभूत इतिहास साकार झाला आहे. ऑस्ट्रेलियन फर्स्ट नेशन्सच्या लोकांनी हजारो वर्षांपूर्वी घालून दिलेले शाश्वतपणे जगण्याचे नियम सॉन्गलाइन्समधून दिसून येतात आणि निर्मितीची, संस्कृतीची मूल्ये त्यांतून प्रसारित होतात.”

‘वॉकिंग थ्रू अ सॉन्गलाइन हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संग्रहालयाने तयार केलेला आंतरराष्ट्रीय प्रवासाचा अनुभव आहे. हा नाट्यमय डिजिटल अनुभव ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित प्रदर्शनातील ‘सॉन्गलाइन्स : ट्रॅकिंग द सेव्हन सिस्टर्स’ या एका घटकावर आधारित आहे, जो सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande