यूपीएच्या 10 वर्षात महाराष्ट्राला किती पैसा दिला...?
अमित शाह यांचा शरद पवारांना जाहीर सवाल अकोला, 23 एप्रिल (हिं.स.) : देशात काँग्रेसप्रणित यूपीएची सत्त
अमित शाह, अकोला सभा


अमित शाह यांचा शरद पवारांना जाहीर सवाल

अकोला, 23 एप्रिल (हिं.स.) : देशात काँग्रेसप्रणित यूपीएची सत्ता असताना शरद पवार 10 वर्षे कृषीमंत्री होते. पवारांनी सांगावे की त्यांच्या शासनकाळात मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी महाराष्ट्राला किती निधी दिला.. ? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. अकोला येथे भाजप उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी मंगळवारी आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी शाह म्हणाले की, इंडी आघाडीने राम मंदिर होऊ दिले नाही, पंतप्रधान मोदींनी 5 वर्षात राम मंदिर बांधले. महाराष्ट्राचे भले पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार करतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी व्यक्त केला. यावेळी शाह म्हणाले की, शरद पवारांना काही प्रश्न विचारायचे आहे. उद्धव ठाकरे यांना काहीच विचारणार नाही, कारण त्यांना आपल्या मुलाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. शरद पवारांना विचारायचे आहे की, तुम्ही 10 वर्ष महाराष्ट्रातून केंद्र सरकारमध्ये होतात. कृषी मंत्रालय सांभाळत होतात. त्या 10 वर्षात सोनिया गांधी, मनमोहन सिंह सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी किती निधी दिला. याचा हिशोब मिळाला पाहिजे की नाही, अशी विचारणा अमित शाह यांनी केली. यावेळी यूपीए आणि एनडीच्या काळातील तुलनात्मक आकडेवारीची माहिती देताना शाह म्हणाले की, युपीए सरकारने महाराष्ट्राला 1 लाख 91 हजार कोटी रुपये दिले होते. तर भाजपा सरकारने गेल्या 10 वर्षात 7 लाख 91 हजार कोटी महाराष्ट्राला दिले. तसेच 2 लाख 90 हजार कोटी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, 75 हजार कोटी रस्ते निर्माणासाठी दिले, अशी माहिती शाह यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande