रत्नागिरीच्या विकासाला वेग देण्यासाठी पुन्हा एकदा हवे मोदी सरकार - नारायण राणे
रत्नागिरी, 24 एप्रिल, (हिं. स.) : एकीकडे सिंधुदुर्गचा विकास होत असताना रत्नागिरीचा सर्वांगीण विकास ह
रत्नागिरीच्या विकासाला वेग देण्यासाठी पुन्हा एकदा हवे मोदी सरकार - नारायण राणे


रत्नागिरी, 24 एप्रिल, (हिं. स.) : एकीकडे सिंधुदुर्गचा विकास होत असताना रत्नागिरीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणे आवश्यक आहे. खासदार म्हणून या विकासाला वेग देण्याचे काम मी करेन, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केले.

श्री. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीतील बुद्धिजीवी मान्यवरांची विशेष बैठक स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करत आहे. पंतप्रधान कॅबिनेट बैठक संपली की वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतात, माहिती घेतात, देशातील जनतेची मते जाणून घेतात. त्यांचे देशातील प्रत्येक भागाकडे लक्ष असते. त्यामुळे कोकण विकासासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हवे आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था ११ वरून ५ व्या क्रमांकावर आणली आहे. आता ती त्यांना तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे. पंतप्रधान दूरदृष्टीचे आहेत. स्वच्छतेचा प्रश्न मार्गी त्यांनी लावला. पाणी प्रश्न मार्गी लावला आहे. आरोग्यासाठी, महिलांसाठी काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केले आहे. देशाबरोबर सिंधुदुर्गात अनेक योजना आणल्या आहेत. आता खासदार झालो तर ‘अबकी बार रत्नागिरी देखेंगे’ अशी ग्वाही श्री. राणे यांनी दिली.

रत्नागिरीच्या आर्थिक, सर्वांगीण विकासाचा विचार सर्वानीच केला पाहिजे, महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. आता उद्योगात प्रगती झाली पाहिजे. यासाठी उद्यमशील विचार करा, त्यासाठी पुढाकार घ्या, उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करा, तरच जिल्ह्याचे आर्थिक उत्पन्न वाढेल. आपण प्रगतीवर व्याख्यान देतो पण याला परिश्रमाची गरज आहे. मराठी लोकांची संख्या उद्योगात कमी आहे. तेव्हा उद्यमशील होण्यासाठी उपलब्ध संधीचा वापर करा. लोकप्रतिनिधींना त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यास भाग पाडा, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांना देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. यासाठी तुम्हीही उद्योग व्यवसायात पुढाकार घ्या आणि मोदींचे हात बळकट करा. आज आपल्या देशाला मोदींची गरज आहे. ज्या देशाचे पंतप्रधान मोदी आहेत, त्या भारताचे आपण नागरिक आहोत असे सांगताना आपला उर भरून येतो. मोदींनी गुणात्मक विकास केला आहे. देशाच्या आणि पर्यायाने आपल्या कोकणच्या विकासाची घोडदौड अशीच कायम ठेवायची असेल तर अबकी बार चारसो पार आणि तिसऱ्यांदा मोदी सरकार हे मनात ठाम निश्चित करून ठेवा. आजपर्यंत मी सिंधुदुर्गसाठी परिश्रम केले आहेत. आपण मला खासदार म्हणून निवडून दिलेत तर मी रत्नागिरीचा एकही प्रश्न मागे ठेवणार नाही, अशी ग्वाही मी तुम्हाला देतो. ज्या वेगाने तुम्हाला विकास आणि प्रगती हवी असेल तर त्याच वेगाने ७ मे रोजी मतदान करा आणि मोदींना तुमचे आशीर्वाद द्या, असे आवाहन राणे यांनी केले.

यावेळी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार बाळ माने, शिवसेना नेते किरण सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, राष्ट्रवादीचे बंटी वणजू व मान्यवर उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande