एकमेकांचे कट्टर विरोधक आमदार बबनराव शिंदे, प्रा. शिवाजी सावंत महायुतीत एकत्र
सोलापूर , 26 एप्रिल (हिं.स.) माढा विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीतून विधानसभेची जोरात तयारी
एकमेकांचे कट्टर विरोधक आमदार बबनराव शिंदे, प्रा. शिवाजी सावंत महायुतीत एकत्र


सोलापूर , 26 एप्रिल (हिं.स.) माढा विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीतून विधानसभेची जोरात तयारी सुरू असून, माढ्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे व शिवसेना शिंदे गटाचे प्रा. शिवाजी सावंत हे महायुतीचे घटक असल्याने एकत्र आहेत.माढा विधानसभेतील हे तगडे विरोधक एकत्र असल्याने आता विरोधी गटात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भरून काढण्याची संधी आता काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे, दादासाहेब साठे, नगराध्यक्ष ॲड. मीनल साठे यांना उपलब्ध झाली आहे.

मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत माढा लोकसभेसाठी उतरल्याने, तालुकानिहाय सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र तर एकत्र असलेले विरोधक झाले आहेत.

माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे व शिवसेनेचे प्रा. शिवाजी सावंत यांचे राजकीय हाडवैर जिल्ह्याला सर्वश्रुत आहेच. पण दोघेही महायुतीचे घटक पक्ष असल्याने यांच्या विरोधात विधानसभा मतदारसंघात नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या ठिकाणी अनेक कार्यकर्ते असले तरी सबंध विधासभेच्याबाबत नेतृत्वाची पोकळी सध्या माढा तालुक्यात निर्माण झाली आहे. हा मतदारसंघ तसा पुरोगामी विचारांशी नाते जोपासणारा व काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार शिंदेंच्या विरोधात तगडे आव्हान उभे करायचे झाल्यास साठे कुटुंबीयांकडे पाहिले जाऊ शकते.

पूर्वीपासून तालुकाभर साठे व शिंदे यांच्याकडेच कार्यकर्त्यांचे जाळे आहे. सहकारात या दोघांचेच चालते. गावोगावच्या ग्रामपंचायती, सहकारी सोसायट्या या ठिकाणी या दोघांचेच वर्चस्व. अलीकडे मात्र शिंदेंचे नेतृत्व मोठे होत गेले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande