नाशिक - मानसशास्त्र कार्यशाळेत नव्या अभ्यासक्रमावर विचारमंथन
नाशिक, २८ एप्रिल, (हिं.स.) - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० नुसार अभ्यासक्रम पुनर्रचना सुरु आह
नाशिक - मानसशास्त्र कार्यशाळेत नव्या अभ्यासक्रमावर विचारमंथन


नाशिक, २८ एप्रिल, (हिं.स.) - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० नुसार अभ्यासक्रम पुनर्रचना सुरु आहे. या संदर्भात मानसशास्त्र विषयाचा एम. ए. द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि भोसला मिलिटरी कॉलेजच्या मानसशास्त्र विभागातर्फे आज एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत नव्या अभ्यासक्रमांच्यासंदर्भात विविध मुद्यांवर विचारमंथन करण्यात आले.

मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे चेअरमन प्राचार्य डॉ.पी.व्ही.रसाळ यांनी औपचारिक उद्घाटन केले. यावेळी भोसला मिलिटरी कॉलेजचे प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, मार्गदर्शक,संशोधक डॉ.मिनाक्षी गोखले, लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र देशमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ.रसाळ म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणाचा खूपच बोलबाला सुरु आहे. वेगवेगळ्यास्तरावर कार्यशाळा, बैठकांमधून चर्चा होऊ लागली आहे, पुढील काळात विद्यार्थी केंद्रभूत मानून हे धोरण अवलंबितांना काठिण्य पातळी,लक्ष किती असावे याचा विचार करावा लागेल, पदवीच्या प्रथम वर्षाला आपण हा अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविण्यास सुरवात केली ही चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतरच्या दोन सत्रात डॉ.गोखले,डॉ.देशमुख यांनी नव्या अभ्यासक्रमांतील विविध मुद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच अध्यापन करतांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या दृष्टीने कसे प्रयत्न करावे, याचे गमकही सांगितले, यावेळी उपस्थित शिक्षकांनी अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande