मुंबईत लहान बालकांची विक्री करणाऱ्या टोळीतील सात जण ताब्यात
- एक डाॅक्टर आणि महिला दलालाचा समावेश - १४ बालकांची विक्री केल्याचे उघड मुंबई, 28 एप्रिल (हिं.स.) -
मुंबईत लहान बालकांची विक्री करणाऱ्या टोळीतील सात जण ताब्यात


- एक डाॅक्टर आणि महिला दलालाचा समावेश

- १४ बालकांची विक्री केल्याचे उघड

मुंबई, 28 एप्रिल (हिं.स.) - मुंबई पोलिसांनी बालकांची विक्री करणाऱ्या एक डाॅक्टर आणि महिला दलालासह एकूण सात आरोपींना अटक केली आहे. याशिवाय तीन जणांना सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंदना पवार, शितल वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर आणि डॉ. संजय खंदारे यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने हे रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या टोळीने आतापर्यंत १४ बालकांची विक्री केल्याचं तपासात उघड झाले आहे. आरोपींनी या टोळीच्या माध्यमातून विक्री केलेल्या लहान बाळांमध्ये १ मुले आहेत, तर तीन मुली आहेत. त्यातील दोन बाळांची सुखरुप सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. कमीत कमी पाच दिवस ते जास्तीत जास्त ९ महिने असं विक्री केलेल्या बाळांचे वय आहे. पोलिस उपायुक्त रागासुधा आर. यांनी दिलेल्या माहितीनुसार एका बीएचएमएस डॉक्टरला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अटकेतील आरोपी मुंबईमधील विविध रुग्णालयांत काम करत आहेत. बालक विक्री प्रकरणात काही रुग्णालयांवर मुंबई पोलिसांचे विशेष लक्ष आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमधील डॉ. संजय खंदारेचा दिव्यामध्ये दवाखाना आहे. मुळचा नांदेडचा रहिवासी असणारा हा डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आलं आहे. पोलिस उपायुक्त रागासुधा आर. म्हणाले की, कदाचित या डॉक्टरकडे लहान मुलांचे हे पालक गेले असावेत. तिथं त्यांचा संपर्क झाला असावा असा आमचा संशय आहे. विक्रोळीमधून एका बाळाची विक्री करुन रत्नागिरीमध्ये देण्यात आलं होतं. तेलंगणामधून या बाळांची डिमांड होती आणि त्यानुसार या बाळांची विक्री केली जात होती. तेलंगणा आणि हैदराबादमधून खास करुन या बाळांच्या खरेदीचा प्रस्ताव होता, असेही त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande