नागपूरच्या नीता अंजनकरांनी बवनले 1000 किलो आंबील
शंखनादच्या विदर्भस्तरीय पाककला स्पर्धेत केला विक्रम एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली विक्रमाची नोंद न
नागपूरच्या नीता अंजनकरांनी बवनले 1000 किलो आंबील


शंखनादच्या विदर्भस्तरीय पाककला स्पर्धेत केला विक्रम

एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली विक्रमाची नोंद

नागपूर, 28 एप्रिल (हिं.स.) : प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी अतुलनीय कामगिरी बजावत एक हजार किलो आंबील बनवून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. महाराष्ट्र टेलिकम्युनिकेशन नागपूर द्वारा संचालित शंखनाद न्यूज चॅनेलच्या वतीने विदर्भस्तरीय पाककला स्पर्धेत त्यांनी हा विक्रम केला.

नागपुरातील समर्थनगर परिसरातील संचेती ज्युनिअर कॉलेजमध्ये आज, रविवारी 28 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत नीता अंजनकर यांनी भरडधान्यापासून एक हजार किलो आंबील तयार करुन हा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. यावेळी एशिया बुक रेकॉर्डच्या ज्युरी मेंबर लता टाक आणि निखिलेश सावरकर यांनी विक्रम झाल्याची अधिकृत घोषणा करीत अवॉर्ड, प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन नीता अंजनकर यांना सन्मानित केले. यावेळी नागपूर येथील वेद संस्थेच्या अध्यक्षा रीना सिन्हा, सीआरपीएफचे डीआयजी प्रशांत जांभुळकर, शंखनाद न्यूज चॅनलच्या संचालिका राखी कुहीकर, संपादक सुनील कुहीकर मंचावर उपस्थित होते.

नागपुरातील कॅन्सर वॉरिअर, प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांच्या नेतृत्वात 1 हजार किलो आंबील बनविण्याचा विश्वविक्रम कर्करोगाविरूद्ध लढा देणाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी घेण्यात आला. यंदाचे वर्ष सुरक्षित, शाश्वत आणि निरोगी भविष्यासाठी भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यासंदर्भात जागृती करण्यासाठी आणि कर्करोगाशी लढा देण्याच्या दृढनिश्चयाने नीता अंजनकर यांनी एक हजार किलो आंबील बनवण्याचा संकल्प केला आणि यशस्वीरित्या पूर्ण केला. यावेळी त्यांनी भरडधान्याचे महत्व आणि त्याचा वापर कसा करायचा याबाबतही जागरूकता निर्माण केली. पौष्टिक भरडधान्य आपण आपल्या नियमित आहारात समाविष्ट करायला हवे आणि ते कसे बनवायचे हे सगळ्यांना माहीत असावे, असे त्या म्हणाल्या. आंबील हे पौष्टिक आणि थंड पदार्थ आहे आणि उन्हाळ्यात ते खास उपयुक्त आहे. म्हणूनच मी आंबील बनवण्याचा निर्णय घेतला. असे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी नीता अंजनकर यांनी उपस्थितांना हा आजार कितीही मोठा असला तरी हसत खेळत राहावे, असा प्रेरणादायी संदेश दिला.

संचेती महाविद्यालयाच्या आवारात आज, रविवारी सकाळी आंबील बनवण्याची प्रक्रिया सुरू असताना प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. विविडच्या विधी सुगंध, जलतज्ज्ञ प्रवीण महाजन, लेखक संजय नाथे, निर्मल अर्बनचे सीईओ राजेंद्र बरडे, डॉ. मोहन अंजनकर, अजय सराफ, स्वप्नील अहिरकर , वाघमारे मसालेचे सारंग वाघमारे, मुकुंद पात्रीकर यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आंबीलचा आस्वाद घेतला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande